पुणे जिल्हा | आरस्क्वेअरमध्ये माळेगाव अभियांत्रिकीचे पाच विद्यार्थी

माळेगाव (वार्ताहर) – माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 5 विद्यार्थ्यांची आरस्क्वेअर सॉफ्ट टेक्नॉलॉजी या अग्रेसर असणार्या कंपनीमध्ये निवड झाली आहे.
शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालय हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील नामांकित महाविद्यालय असून चालू शैक्षणिक वर्षांमध्ये पुणे जिल्हा ग्रामीण भागामधील सर्वाधीक प्लेसमेंट देणारे महाविद्यालय म्हणून नावलौकिक मिळालेला आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच नव-नवीन क्रियाशील उपक्रम राबवण्यासाठी माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालय नेहमीच अग्रेसर असते.
याचाच परिपाक म्हणून महाविद्यालयातील चालू शैक्षणिक वर्षातील 5 विद्यार्थ्यांची आयटी क्षेत्रातील अग्रेसर असणार्या आरस्क्वेअर सॉफ्ट टेक्नॉलॉजी या कंपनीमध्ये निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. मुकणे यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या निवडीची प्रक्रिया ही अॅप्टीट्यूड टेस्ट व टेक्निकल इंटरव्यू या दोन स्तरावर मूल्यांकन करून संपन्न झाली. या निवड प्रक्रियेत कॉम्प्युटर व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील 3 विद्यार्थी यशस्वी झाले.
सर्व क्षेत्रात यशस्वी असणारे उत्कृष्ट विद्यार्थी घडविण्यासाठी माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयाचा लौकिक आहे.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच रोजगारक्षम बनवणारे कौशल्य विकसित करण्यासाठी माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये विविध विषयांवर आधारित कार्यशाळांचे महाविद्यालयामार्फत आयोजन करण्यात येत असल्याची माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा.जावेद शेख यांनी दिली.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष व माळेगाव सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष केशवराव जगताप व संचालक मंडळ, विश्वस्त वसंतराव तावरे, अनिल जगताप, रवींद्र थोरात, महेंद्र तावरे, रामदास आटोळे, गणपत देवकाते, निमंत्रित सदस्या सीमा जाधव, चैत्राली गावडे व संस्थेचे सचिव डॉ. धनंजय ठोंबरे यांनी अभिनंदन केले.
वार्षिक 3 लाख वेतन
रत्नेश क्षीरसागर, चंद्रकांत कुंभार, आकाश मुळीक, जयदीप निगडे व प्राची करपे या विद्यार्थ्यांचा निवडीमध्ये समावेश आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक 3 लाख वेतन कंपनीतर्फे देण्यात येणार आहे.





