पाच पोलीस तडकाफडकी निलंबित; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांच्या विधानसभेसह काही राज्यांमध्ये पोटनिवडणूकीसाठी आज मतदान पार पडले. यात उत्तर प्रदेशमधील नऊ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीवेळी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाच पोलीस कर्मचाऱ्यांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली.
उत्तर प्रदेश पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर समोर आलेल्या माहितीनुसार, मतदारांना तपासण्यासाठी आणि निवडणुकीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्या प्रकरणी पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहे. एका विशिष्ट समुदायातील लोकांना मतदान करण्यापासून रोखले जात असल्याच्या विरोधी पक्षांच्या, प्रामुख्याने समाजवादी पक्षाच्या तक्रारींनंतर निवडणूक आयोगाने ही कारवाई केली.
सूत्रांनी माहितीनुसार, कानपूरमध्ये दोन, मुझफ्फरनगरमध्ये दोन आणि मुरादाबादमध्ये एका पोलिसाला निलंबित करण्यात आले आहे. तसेच तिघांना मुरादाबादमधील ड्युटीवरून हटवण्यात आले आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाकडून निवडणूक अधिकाऱ्यांना मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत.
मात्र, समाजवादी पक्षाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर उत्तर प्रदेशमधील काही मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काही समुदायांना मतदान करण्यापासून रोखल्याबद्दल तक्रार केली होती. या तक्रारींची दखल घेत निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे.





