जुन्या वादातून पाच जणांचा तरूणावर कोयत्याने हल्ला; गोगलवाडी चर्तुमुख घाटातील घटना, आरोपी अजूनही मोकाट

खेड शिवापूर: जुन्या वादातून रचलेल्या कटातून एका तरुणावर गोगलवाडी येथील चर्तुमुख घाटात कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणात पाच जणांविरोधात राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, जखमी तरुण रुग्णालयात उपचार घेत आहे. गंभीर गुन्हा करूनही आरोपी अजूनही मोकाट असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आरोपींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
या प्रकरणी फिर्याद हमीद अब्दुल रहेमान पानवाले (वय २२, सध्या रा. वाघजाई माता मंदिराजवळ, भिलारेवाडी, पुणे, मूळगाव – कर्नाटक) यांनी राजगड पोलिसांत दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, दि. २६ मे रोजी आरोपी शंकर नामदेव सरोदे याने हमीदच्या दुचाकीवर लघुशंका केली. यावरून त्यांच्यात वाद झाला. वादादरम्यान शंकरने “बघून घेतो” असे म्हणत धमकी देत तो निघून गेला.
कट आखून घाटात हल्ला
यानंतर २७ मे रोजी आरोपी शंकर याने हमीदच्या नातेवाईक महम्मद शेख यांना फसवून त्यांच्याकडील मोबाईल हिसकावून जबरदस्तीने एका रिक्षामध्ये बसवले. त्यानंतर त्याला गोगलवाडी (ता. हवेली) येथील चर्तुमुख घाटात घेऊन गेले. तिथे कोयत्याचा धाक दाखवून महंमद यांना हमीदच्या भावास म्हणजेच रफिक याला फोन करायला लावले. “एक नवीन काम मिळालं आहे” असे सांगून रफिकला घाटात बोलावण्यात आले.
रफिक घाटात पोहोचताच, तिथे आधीच दबा धरून बसलेल्या शंकर व त्याच्या पाच साथीदारांनी अचानक हल्ला चढवला. रफिकच्या पाठीवर, खांद्यावर आणि हातावर कोयत्याने सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केले. त्याच्यासोबत दुचाकीवर आलेला अन्वर आणि रिक्षातून आलेला महंमद यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ करण्यात आली. हल्ल्यानंतर सर्व आरोपी तिथून पळून गेले.
या हल्ल्यानंतर महंमदने संपूर्ण प्रकाराची माहिती हमीदला दिली. हमीदने तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली आणि गंभीर जखमी रफिकला रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी हमीदच्या तक्रारीनुसार राजगड पोलीस ठाण्यात शंकर नामदेव सरोदे व त्याच्या पाच साथीदारांविरुद्ध भारतीय दंड विधानातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस फौजदार अजित पाटील व त्यांचे सहकारी या घटनेचा तपास करत असून, आरोपी अजूनही फरार आहेत. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.
कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. “जुन्या किरकोळ वादातून एका व्यक्तीवर घाटात नेऊन कोयत्याने प्राणघातक हल्ला होतो आणि आरोपी मोकाट फिरतात, ही बाब अत्यंत गंभीर असून पोलिस यंत्रणेला हादरवणारी आहे,” असे नागरिक म्हणत आहेत. आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्या विरुद्ध जलदगतीने खटला चालवून कडक शिक्षा व्हावी, अशी जोरदार मागणी होत आहे.





