ब्रिटनहून आलेले आणखी पाच करोना पॉझिटिव्ह

‘जिनोमिक सिक्वेंन्सिंग’ टेस्ट होणार
पुणे – ब्रिटनहून आलेल्या आणखी पाच जणांना करोनाची लागण झाल्याचे गुरुवारी निष्पन्न झाले. यात पिंपरी-चिंचवडमधील तीन जणांचा समावेश आहे. पुण्यात ब्रिटनहून आलेल्या करोनाबाधितांची संख्या आता 15 झाली आहे. त्यातील एकामध्ये “ब्रिटन स्ट्रेन’चे लक्षणे आढळून आली असून, दुसऱ्या रुग्णाचा “जिनोमिक सिक्वेन्सिंग’ रिपोर्ट येत्या दोन दिवसांत उपलब्ध होणार आहे. ब्रिटनहून आलेल्या राज्यातील बाधितांची संख्या 78 झाली आहे.
नव्याने सापडलेल्या या बाधितांना डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात विलगीकरणात ठेवले आहे. या नागरिकांनाही “ब्रिटन स्ट्रेन’ची लागण झाली आहे का, याची तपासणी केली जाणार आहे. ब्रिटनहून आलेल्या गोखलेनगरमध्ये राहणाऱ्या एका तरुणाला “ब्रिटन स्ट्रेन’ची लागण झाल्याचा अहवाल 4 जानेवारीला आला. त्याला डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात 14 दिवस ठेवण्यात आले होते.
त्यादरम्यान, 26 डिसेंबर 2020 रोजी “जिनोमिक सिक्वेन्सिंग’ टेस्टसाठी त्याचे नमुने घेतले होते. त्याचा अहवाल येण्याआधीच त्याच्या करोनाच्या सगळ्याच टेस्ट निगेटिव्ह आल्याने त्याला घरी सोडून देण्यात आले. त्यानंतर त्याला घरीच विलगीकरण केले. दुसऱ्या एका करोना पॉझिटिव्ह रुग्णाचाही “जिनोमिक सिक्वेन्सिंग’ अहवाल शुक्रवारी किंवा शनिवारी येणे अपेक्षित आहे. त्यावेळी त्याला “ब्रिटन स्ट्रेन’ची लागण झाली आहे का, याचा तपशील समजू शकणार आहे.
ब्रिटनहून आलेल्या आणि ज्यांच्या करोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत त्या सगळ्यांच्याच “जिनोमिंग सिक्वेन्सिंग’ टेस्ट करण्यात आल्या आहेत. राज्यातील “ब्रिटन रिटर्न’बाधितांची संख्या 75 झाली असून, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या आणि पॉझिटिव्ह झालेल्यांची संख्या 30 झाली आहे.





