पिंपरी | मोरेवस्तीत एका रात्रीत पाच मेडिकल दुकाने फोडली

पिंपरी (प्रतिनिधी) – चिखली परिसरात दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. पोलीस प्रशासन रात्रीच्या वेळी गस्त घालते की नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक व व्यावसायिकांना पडला आहे. मोरेवस्तीमध्ये मंगळवारी (दि. 2) पहाटे पाच मेडिकल व इतर दुकाने चोरट्यांनी फोडली.
परंतु पोलीस प्रशासनाला याचा थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे पोलीस प्रशासन नेमके करते काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. चोरी करणार्या चोरट्यांना तात्काळ अटक करून शिक्षा करावी, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष यश साने यांनी केली आहे.
चिखली येथील मोरेवस्ती परिसर दाट लोकवस्तीचा आहे. येथे कामगार मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहेत. येथे मध्यरात्रीपर्यंत विविध शिपमध्ये काम करणार्यांचा रस्त्यावर राबता असतो. तरीदेखील अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी (दि. 2) पहाटे तीनच्या सुमारास मोरेवस्ती परिसरातील काही किराणा दुकाने, गॅरेज तसेच मेडिकलची दुकाने फोडून चोरी केली आहे.
परंतु रात्रभर गस्त घालणारे पोलीस प्रशासन नेमके कुठे गस्त घालते असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. एका रात्रीत जर एवढी दुकाने विविध परिसरात फोडली जात असून याचा काहीच मागमूस पोलीस प्रशासनाला लागत नसेल तर नागरिकांनी व व्यावसायिकांनी रात्रीचे शांत कसे झोपावे अशी चर्चा परिसरात सुरू आहे. या चोरीच्या घटनांमुळे चिखली परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यामध्ये सिद्धिविनायक मेडिकल (सावकार चौक), मोरया मेडिकल (संगम सोसायटी), केअर क्युअर मेडिकल (टॉवरलाइन, मोरे वस्ती), साने अँड सन्स मेडिकल (झेंडा चौक), स्वामी मेडिकल (टॉवर लाइन, नामदेव सोसायटी) तसेच ओम ट्रेंडिंग कंपनी आणि भगवती ट्रेंडिंग, मोरे वस्ती त्याचबरोबर तीन गॅरेज फोडले आहेत.
या दुकानांचे शटर लॉक तोडून चोरी करण्यात आली. त्यामध्ये व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड केमिस्ट असोसिएशन व स्थानिक व्यावसायिक आणि यश साने यांनी चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांना लेखी निवेदन दिले आहे. तसेच नागरिकांमध्ये जे भीतीचे वातावरण निर्माण झाले ते दूर करण्यासाठी चोरट्यांना लवकरात लकवर पकडून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पोलिसांना नाही घटनेचे गांभीर्य
मेडिकल व इतर दुकाने चोरट्यांनी फोडल्याचे नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी पोलीस मदत केंद्र नंबर 112 क्रमांकावर फोन करून घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी आल्यानंतर त्यांना सर्व माहिती दिली. परंतु पोलिसांनी साधी पाहणी देखील न करता घडलेली घटना ही किरकोळ आहे.
असे सांगून सकाळी साने चौकीला या म्हणून पोलीस निघून गेले याचाच अर्थ एवढ मोठी घटना घडून देखील मोरे वस्ती चिखली भागात पोलिसांना याचे काहीच वाटत नाही. गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक उरला नाही. कर्तव्यात कसूर करणार्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.





