तिघांना 24 वर्षांचा तुरुंगवास तर इतरांची निर्दोष मुक्तता
रियाध, (सौदी अरेबिया) : सौदी अरेबियाचे पत्रकार जमाल खाशोगी यांच्या हत्येप्रकरणी सौदीतील न्यायालयाने 5 जणांना फाशीची शिक्षा सुनावली गेली आहे. मात्र खाशोगी यांच्या हत्येमागे हात असल्याचा आरोप असलेल्या दोघांना आरोपमुक्त करण्यात आले आहे, असे सौदीतील सरकारी वकिलांनी आज सांगितले. खाशोगी यांच्या हत्येमध्ये प्रत्यक्ष सहभाग असलेल्या 5 जणांना फाशीची शिक्षा सुनावली गेली आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
वॉशिंग्टन पोस्ट या अमेरिकेतील वर्तमानपत्रासाठी स्तंभलेखन करणारे पत्रकार जमाल खाशोगी यांच्या हत्येच्या कटाची अंमलबजावणी सौदीतील गुप्तहेर संस्थेचे उपाध्यक्ष अहमद अल असिरी यांच्या देखरेखीखाली केली गेली, असे सरकारी पक्षाने म्हटले आहे. खाशोगी यांची हत्या ऑक्टोबर 2018 मध्ये केली गेली. या बाबत असिरी यांना राजन्यायालयाच्ये माध्यम प्रमुख सौद अल कहतानी यांनी सल्ला दिला होता.
कहतानी यांच्याविरोधातील तपासामध्ये त्यांच्याविरोधात कोणतेही पुरावे आढळले नाहीत. असिरी यांच्याविरोधातही तपास केला गेला, मात्र त्यांच्याही विरोधात कोणताही पुरावा न आढळल्यामुळे त्यांची निर्दोष मुक्तता केली गेली.
या प्रकरणात 11 व्यक्तींविरोधात हा खटला चालवला गेला होता. त्यापैकी 5 जणांना मृत्यूदंड तर तिघांना 24 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली गेली. इतरांची निर्दोष मुक्तता केली गेली. खाशोगी यांची हत्या पूर्वनियोजनातून केली गेली नसल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.
रियाधमधील न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी एकूण 9 सत्रांमध्ये झाली. या सुनावणीला आंतरराष्ट्रीय समुदायाबरोबरच खाशोगी यांच्या नातेवाईकही उपस्थित होते.