MLA T Raja Singh : तेलंगणातील प्रखर हिंदुत्ववादी नेते आणि आमदार टी राजा सिंह हे त्यांच्या विधानांनमुळे सतत चर्चेत असतात. त्यांनी पुन्हा एक एक चिथावणीखोर वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. धर्मासाठी लढणाऱ्यांनी बंदुकीचा परवाना घ्यावा. जिथे मदत लागेल, तिथे आमचे लोकं त्यासाठी मदत करतील. देशद्रोही हल्ला करण्यासाठी आले तर त्यांना गोळी मारण्यासारखे हत्यार असले पाहिजेत. एका एका घरात पाच पाच बंदूक असली पाहिजे, असे चिथावणीखोर वक्तव्य टी राजा सिंह यांनी केले आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यावरुन वादाची शक्यता आहे. तसेच राज्यात कायदेशीर आणि राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील आयोजित रामनवमीच्या सभेत त्यांनी हे वक्तव्य केले आहे. टी राजा सिंह यांनी आपल्या भाषणात राज्याचे आमदार आणि मंत्री नितेश राणे यांच्या विधानाचा संदर्भ देत त्यांनी राज्यातील मदरशांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्रातील मदरसे बंद करण्याबाबत जे विधान केले आहे, त्याचे मी समर्थन करतो. मदरशांमध्ये देशविरोधी कारवायांचे प्रशिक्षण दिले जाते. जिथे देशद्रोही तयार होतात, असे मदरसे आम्ही चालू देणार नाही. केवळ बंद करून चालणार नाही, तर या अनधिकृत मदरशांवर बुलडोझर चालवण्याची गरज आहे, अशी मागणी टी राजा सिंह यांनी केली आहे. पुढे बोलताना त्यांनी दाऊद इब्राहिम आणि अजमल कसाब यांचा उल्लेख करत अजमल कसाबसारखे लोक मदरशातूनच तयार झाले आहेत. तिथे हिंदूविरोधी कारवाया शिकवल्या जातात, असा खळबळजनक दावा केला आहे. तसेच औरंगजेबाच्या कबरीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांना थेट आव्हान केले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना औरंगजेबाची कबर हटवण्याची भीती वाटते का? असा थेट सवाल करत मुस्लिम समाज तुम्हाला कधीच मतदान करणार नाही, हे लिहून घ्या, असे ते म्हणाले. महाराष्ट्रातील हिंदूंना वाटते की औरंगजेबाची कबर उखडून तिथे शौचालय बांधले पाहिजे. जर ही कबर हटवण्यासाठी मावळ्यांची गरज असेल, तर लाखो हिंदू तिथे येण्यास तयार आहेत, असेही विधान टी राजा सिंह यांनी केले. चिथावणीखोर वक्तव्य धर्मासाठी लढणाऱ्यांनी बंदुकीचा परवाना घ्यावा. जिथे मदत लागेल, तिथे आमचे लोकं त्यासाठी मदत करतील. देशद्रोही हल्ला करण्यासाठी आले तर त्यांना गोळी मारण्यासारखे हत्यार असले पाहिजेत. एका एका घरात पाच पाच बंदूक असली पाहिजे. टी राजा सिंह हे भारतीय जनता पक्ष (BJP) चे आमदार आहेत.ते हैदराबाद येथील गोशामहल मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. हेही वाचा : Dacoit Trailer : ‘धुरंधर २’नंतर ‘डकैत’ चित्रपटाच्या ट्रेलरला मोठा प्रतिसाद; मृणाल ठाकूरचा दमदार अंदाज