Pune : जिल्ह्यात साडेपाचशे बालके कुपोषित

पुणे : महिला व बालकल्याण विभागाने कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यासाठी पाऊल उचलले आहे. गेल्या महिन्यात जिल्ह्यात सर्वेक्षण करून तब्बल ५५२ कुपोषित बालकांचा शोध घेण्यात आला. त्यात ७२ बालके ही तीव्र कुपोषित असल्याचे स्पष्ट झाले. या सर्व बालकांना ग्राम बाल विकास केंद्रांमध्ये ठेवण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून शून्य ते सहा वयोगटातील मुलांमधील कुपोषण टाळण्यासाठी मुलांना चौरस आहार दिला जातो. या मुलांच्या पोषणासाठी अंगणवाडी सेविकांना आगाऊ स्वरूपात जिल्हा परिषदेकडून निधी देण्यात येतो. गेल्या महिन्यामध्ये जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून कुपोषित बालकांचा शोध घेण्यासाठी एक सर्व्हे करण्यात आला. यात ५५२ कुपोषित बालके आढळून आली. यात ७२ तीव्र कुपोषित, तर ४८० मध्यम कुपोषित बालके आढळली. या सर्व बालकांना ग्राम बालविकास केंद्रात दाखल करून त्यांना आहार आणि औषधोपचार करण्यात येणार आहे.
या केंद्रामध्ये बालकांना आठ वेळा पौष्टिक आहार व आवश्यक औषधे देण्यात येतात. कुपोषित बालकांना दैनंदिन आहार, औषधे आणि त्यांचे दररोज मॉनिटरिंग केले जाते. याशिवाय शनिवारी व रविवारी या सुटीच्या दिवशीही तालुक्यातील अधिकाऱ्यांना दुसऱ्या तालुक्यात जाऊन प्रत्यक्षात पाहणीची जबाबदारी देण्यात येते. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली औषधोपचार केले जातात.
संख्येत घट
जिल्ह्यात पूर्वी हजारांच्या घरात कुपोषित बालके आढळून येत होती. मात्र, त्याचे प्रमाणात आता कमी झाले आहे. या वेळी ५५२ कुपोषित बालके आढळून आली आहेत. ग्राम बालविकास केंद्रांमध्ये प्रत्येक अंगणवाडी सेविका, तालुक्यातील अधिकारी, तसेच डॉक्टर यांनी चांगले काम केले. म्हणून कुपोषणाच्या संख्येत घट झाली आहे. सर्वेक्षणात आढळलेल्या बालकांवरही ग्राम बालविकास केंद्राद्वारे उपचार करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषेदच्या महिला व बालकल्याण विभागाकडून देण्यात आली.




