क्रिकेट कॉर्नर : माती बदलली की मानसिकता

भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पहिल्या डावात यजमान वेस्ट इंडीजला 150 तर दुस-या डावात केेेेवळ 130 च धावा करता आल्या, हे कशाचे द्योतक आहे. त्यांनी त्यांच्या देशातील मैदानांवर खेळपट्टी तयार करताना माती बदलली की मानसिकता, असा प्रश्न निर्माण होत आहे.
ज्या खेळपट्टीवर त्यांचे फलंदाज राज्य करायचे तिथेच आताच्या संघातील फलंदाज गुलामी करताना दिसत आहेत. भारतीय फिरकी गोलंदाजीने जगावर राज्य केले. मात्र, त्यातही रोहन कन्हाय, अल्विन कालिचरणपासून व्हीव्हियन रिचर्डस, क्लाईव्ह लॉईड, सर गॅरी सोबर्स ते ब्रायन लारा या सगळ्याच दिग्गज फलंदाजांनी फिरकीवरही राज्य केले. मग सध्याच्या संघातील फलंदाज रविचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा या भारताच्या दोन फिरकी गोलंदाजांसमोर आट्यापाट्या खेळताना का दिसत आहेत.
मुळाक्षरेही त्यांनी गिरवलेली नाहीत व भारतीय फिरकी गोलंदाजीचा अभ्यासही केलेला नाही हे उघड आहे. त्यांच्या संघासह मेंटॉर म्हणून महान फलंदाज ब्रायन लारा असूनही ही अवस्था कशी होते, हे न उलगडणारे कोडे आहे.
लारासह शिवनरेन चंदरपॉल, रामनरेश सरवान किंवा आत्ताच्या संघातील क्रेग बर्थव्हाइट हे फिरकीसमोर रुबाबात खेळण्यासाठी ओळखले जातात, तरीही हे घडले याचे कारण काय. एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी यंदा त्यांचा संघ पात्र होऊ शकला नाही व त्यांच्यावर टीकेचा भडीमार झाला. कदाचित याच टीकेच्या खाली ते दबले गेले असावेत.
एखाद्या नवोदित, परंतू तळातील फलंदाजाला थेट वासीम अक्रमसमोर उभे केल्यावर जे घडेल तेच त्यांच्या संपूर्ण संघाचे अश्विन व जडेजासमोर झाले. ते पहिल्या डावात मोठे फटके मारण्यासाठीच सज्ज होते. एकेरी व दुहेरी धावा या कसोटीत किती महत्त्वाच्या असतात हे लारानेही त्यांना सांगितले नसेल अशी शंका येते. याच एकेरी व दुहेरी धावांवर कसोटी फलंदाज संपूर्ण ताटभर जेवण करतो. हे असत्य वाटत असेल तर विक्रमादित्य सुनील गावसकरांनी किंवा राहुल द्रविड यांनी फटकावलेली प्रत्येक शतकी खेळी पाहा, तुम्हाला खात्री पटेल. स्ट्राईक रोटेट करण्याची हीच सर्वोत्तम पद्धत असते.
एखाद्या फलंदाजाला काही ठरावीक गोलंदाज त्रस्त करत असतील तर अशा वेळी एकेरी धावा या ऑक्सिजनचे काम करतात. वेस्ट इंडीजच्या फलंदाजांना जगभरात होत असलेल्या विविध टी-20 लीग खेळण्याची इतकी सवय झाली आहे की चौकार व षटकार मारला नाही तर शिक्षा होईल की काय अशी भीती वाटत असावी.
याच अनाकलनीय मानसिकतेतून बाहेर येत त्यांनी भारताच्या गोलंदाजीचा सामना केला तर याच मातीतून त्यांच्या विजयाची शिवारे फुललेली दिसतील.





