#WIvIND 2nd T20 : पूरनचे झंझावाती अर्धशतक; वेस्ट इंडिजचा Team India वर शानदार विजय

WI vs IND 2nd T20 : वेस्ट इंडिजने दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा दोन विकेट राखून पराभव केला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने सात विकेटच्या मोबदल्यात 152 धावा केल्या.
प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने 18.5 षटकात आठ गडी गमावून 155 धावा केल्या आणि सामना जिंकला. वेस्ट इंडिजकडून निकोलस पूरन याने 40 चेंडूत सर्वाधिक 67 धावांची खेळी केली. पूरनने आपल्या खेळीत सहा चौकार आणि सहा षटकार लगावले.
हेटमायर यानेही महत्वाची खेळी केली. हेटमायर याने 22 चेंडूत एक चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 22 धावांची खेळी केली. कर्णधार रोवमन पॉवेल याने 19 चेंडूत एक षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने महत्वपूर्ण 21 धावा केल्या.
16 व्या षटकात वेस्टइंडिजची धावसंंख्या 8 बाद 129 अशी असताना अकिल हुसेन आणि अल्झारी जोसेफ या जोडीने तळाला दमदार फलंदाजी करत विडिंजला सहज विजय मिळवून दिला. अकिल हुसेन याने नाबाद 16 तर अल्झारी जोसेफ याने नाबाद 10 धावांची खेळी करत संघाचा विजय साकारला.
दरम्यान, भारताकडून हार्दिक पांड्या याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर युजवेंद्र चहल याने दोन फलंदाजांना बाद केले तर अर्शदीप आणि मुकेश कुमार यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.
तत्पूर्वी, टीम इंडियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 विकेट गमावत 152 धावा केल्या होत्या. भारताकडून फलंदाजीत तिलक वर्माने 41 चेंडूत पाच चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने सर्वाधिक 51 धावा केल्या.
इशान किशनने 27 आणि हार्दिक पंड्याने 24 धावांचे योगदान दिले. अक्षर पटेलने 14 धावा केल्या. या चौघांव्यतिरिक्त एकाही भारतीय फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. सूर्यकुमार यादव एक धावेवर तर संजू सॅमसन 7 धावा काढून बाद झाला.
वेस्ट इंडिजकडून गोलंदाजीत अल्जारी जोशेफ,अकील हुसैन आणि रोमारियो शेफर्ड यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.





