Ashish Shelar on Raj Thackeray | शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ‘दैनिक सामना’साठी संयुक्त मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये मुंबई महापालिका निवडणूक, मराठी माणसाचे अस्तित्व, मुंबईकरांना भेडसवणारे प्रश्न आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. ही मुलाखत उबाठा गटाचे खासदार संजय राऊत आणि सिनेदिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी घेतली. मात्र या मुलाखतीवरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे बंधुंवर जोरदार टीका केली आहे. ठाकरेंना मुंबईकरांशी देणेघेणे नाही. मुंबईत पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती, तेव्हा ठाकरे बंधू कुठे होते? असा सवाल करत शेलार यांनी निशाणा साधला आहे. ‘चित्रपट बघायचे आणि फापडा जिलेबी खायचे’ आशिष शेलार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, “मुंबईकर जेव्हा पुरात अडकले तेव्हा कुणी बंगल्यावर तर कुणी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये होते. हे दोन भाऊ पुराच्या वेळी मुंबईकरांसाठी कुठे दिसले का? हे सगळे फिल्मी लोक आहेत. चित्रपट बघायचे आणि फापडा जिलेबी खायचे, मित्रांबरोबर गप्पा मारायच्या, त्यांना मुंबईकरांशी काही घेणंदेणं आहे का? त्यांचा मुंबईच्या विषयाशी काय संबंध आहे? मुंबईकरांसाठी ते कधी रस्त्यावर आले आहेत का?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचा माहीम विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला होता. यावरून आशिष शेलार यांनी राज ठाकरेंना टोला लगावला. “तुमच्या घरातल्या व्यक्तीला तुम्ही जिंकवू शकले नाहीत. ज्यांनी घरी बसवलं, त्या उबाठा सेनेसोबत तुम्ही हात मिळवणी केली. सगळ्यात आधी तुमच्या घरातल्या लोकांना कोणी घरी बसवले ते आधी बघा,” असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे. याशिवाय महेश मांजरेकर यांनी राजकारणात पडू नये, असेही आशिष शेलार यांनी यावेळी सांगितले. तब्बल 20 वर्षानंतर ठाकरे बंधु एकत्र का? दरम्यान, या ‘सामना’तील मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी 20 वर्षानंतर ठाकरे बंधु एकत्र येण्यामागचे कारण काय? हे देखील सांगितले आहे. “कुठल्याही भांडणापेक्षा आणि वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आज संकट महाराष्ट्रावर आहे, मुंबईवर आहे, महाराष्ट्रातील अनेक शहरांवर आहे. हे संकट काय आहे हे मराठी माणसाला समजलेलं आहे. काय प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे याची जाणीव त्याला आहे. ही एकच गोष्ट आम्ही एकत्र येण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे. आज एकत्र नाही आलो आणि आज एकजुटीने सामना नाही केला तर मला असं वाटतं, महाराष्ट्र आम्हाला माफ करणार नाही,” असे राज ठाकरे म्हणाले. हेही वाचा: भाजप नेत्या नवनीत राणांना मोठा दिलासा; ‘त्या’ प्रकरणात न्यायालयाने ठरवलं दोषमुक्त