satara | वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी जाहीर

सातारा, (प्रतिनिधी) – महायुती व महाविकास आघाडी यांच्या उमेदवार याद्यांचा घोळ अद्याप सुरू असताना वंचित बहुजन आघाडीने आज आपली पहिली यादी जाहीर केली.
आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी 21 जणांची पहिली यादी जाहीर केली असून यामध्ये सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण मधून संजय गाडे तर कोरेगाव तालुक्यातील चंद्रकांत कांबळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
सातारा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मोठ्या पक्षांबरोबर प्रादेशिक पक्षांच्या आघाड्या सुद्धा राजकीय समीकरणे जुळवताना प्रस्थापितांना डोकेदुखी ठरणार आहेत.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची फारकत घेऊन काही वर्षांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी हा पक्ष स्थापन केला होता. या पक्षाची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली. एकूण 21 उमेदवारांची ही यादी जाहीर करण्यात आली आहे.
या यादीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये पिपाणी चिन्हावर तब्बल 37 हजार मते घेणारे संजय गाडे पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने कराड दक्षिण मधून उमेदवार असणार आहेत तसेच कोरेगाव मधून चंद्रकांत कांबळे यांना संधी देण्यात आली आहे.
उमेदवाराचे निवडून येण्याची गुणवत्ता,जनसंपर्क, तसेच कार्यकर्त्यांचे असणारे जाळे, याशिवाय जनतेसमोर विकास कामे घेऊन जाण्याची विशिष्ट पद्धत या सर्व निकषांवर या 21 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.
जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार काय करिष्मा करणार याची खरी उत्सुकता आहे. वंचितचे उमेदवार प्रस्थापितांना चांगली टक्कर देतील असा विश्वास प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे.





