Moushami Chattarjee : आधी मुलगी, आता पतीचीही साथ सुटली; ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चटर्जी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर!
Moushami Chattarjee : जयंत मुखर्जी हे चित्रपटसृष्टीतील एक परिचित नाव होतं. त्यांनी ‘मजाक’, ‘दो लडके दोनों कडके’ आणि ‘बीवी और मकान’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली होती.

Moushami Chattarjee : बॉलिवूडमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चटर्जी यांचे पती आणि प्रसिद्ध सिनेनिर्माते जयंत मुखर्जी यांचं निधन झालं आहे. गुरुवारी, १२ नोव्हेंबर २०२६ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वार्धक्य आणि काही आरोग्यविषयक समस्यांमुळे जयंत मुखर्जी यांचं निधन झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यांनी राहत्या घरीच अखेरचा श्वास घेतला. मात्र, त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
जयंत मुखर्जी हे चित्रपटसृष्टीतील एक परिचित नाव होतं. त्यांनी ‘मजाक’, ‘दो लडके दोनों कडके’ आणि ‘बीवी और मकान’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली होती. त्यांचं संगीताशीही अतूट नातं होतं. प्रसिद्ध संगीतकार हेमंत कुमार यांचे ते चिरंजीव होते.
वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी मौसमी चटर्जी यांनी केलं होतं लग्न
मौसमी चटर्जी आणि जयंत मुखर्जी यांच्या लग्नाची कहाणीही विशेष चर्चेत राहिली होती. १९७२ मध्ये दोघांनी विवाह केला. त्यावेळी मौसमी चटर्जी अवघ्या १५ वर्षांच्या होत्या आणि दहावीत शिकत होत्या. आपल्या मावशीची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी इतक्या कमी वयात लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं.
आधी मुलगी गमावली, आता पतीचीही साथ सुटली
मौसमी चटर्जी आणि जयंत मुखर्जी यांना पायल आणि मेघा अशा दोन मुली आहेत. १३ डिसेंबर २०१९ रोजी त्यांची मोठी मुलगी पायल मुखर्जी हिचं वयाच्या ४५ व्या वर्षी निधन झालं होतं. ती बराच काळ कोमात होती.
आधी मुलीच्या निधनाचा मोठा आघात सहन केलेल्या मौसमी चटर्जी यांच्यावर आता पतीच्या निधनामुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या कठीण काळात चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि चाहत्यांकडून त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त केल्या जात आहेत.





