पुणे | पहिला ‘हरित ऊर्जा’ प्रकल्प कार्यान्वित

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महावितरणच्या राज्यभरातील विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन्सला सौरऊर्जा प्रकल्पांद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. या नियोजनातील पहिला प्रकल्प गणेशखिंड येथे नुकताच कार्यान्वित झाला आहे.
महावितरणच्या प्रकाश भवनाच्या छतावर ६० किलोवॅटच्या सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे त्याच ठिकाणी असलेल्या विद्युत वाहन चार्जिंग स्टेशनला वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पातून दरमहा सुमारे ७ हजार २०० युनिट विजेची निर्मिती होणार असून, त्याद्वारे चार्जिंग स्टेशनला पुरवठा सुरु करण्यात आला आहे.
गणेशखिंड येथील प्रकाश भवनाच्या छतावरील सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करून तेथील विद्युत वाहन चार्जिंग स्टेशनला वीजपुरवठा सुरू करण्याचा कार्यक्रम नुकताच झाला. केंद्रीय नवीन व नवकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे सहसचिव दिनेश जगदाळे व संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांच्या हस्ते हा प्रकल्प सुरू करण्यात आला.
या वेळी प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, मुख्य अभियंता राजेंद्र पवार, अतिरिक्त महासंचालक (महाऊर्जा) पंकज तगलपल्लेवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
महावितरणकडून राज्यभरात अनेक उपकेंद्र व प्रशासकीय इमारतीच्या आवारात विद्युत वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहेत. यात पुणे परिमंडलामध्ये शहरी व ग्रामीण भागात एकूण १८ ठिकाणी विद्युत वाहनांचे चार्जिंग स्टेशन्स कार्यान्वित झाले आहेत.
या चार्जिंग स्टेशनला हरित ऊर्जेतून वीजपुरवठा करण्यासाठी आता चार्जिंग स्टेशनलगतच्या इमारतीवर किंवा खुल्या जागेवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. त्यातील पहिला प्रकल्प गणेशखिंड येथे पूर्णत्वास गेला आहे. या कार्यक्रमाला अधीक्षक अभियंता अरविंद बुलबुले, युवराज जरग, संजीव राठोड, अनिल गेडाम, अमित कुलकर्णी, संजीव नेहते आदींची उपस्थिती होती.





