Solar energy sector shares: अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने अचानक सौरऊर्जे संबंधातील उत्पादनावर 125.87% इतके अँटीडम्पिंग शुल्क लावले आहे. यामुळे भारतीय कंपन्यावर याचा परिणाम होण्याची शक्यता असल्याचे समजून गुंतवणूकदारांनी या कंपन्यांच्या शेअरची विक्री केली. वारी इंजिनिअर्स या कंपनीच्या शेअरचा भाव 10.47 टक्क्यांनी, प्रीमियर एनर्जी या कंपनीच्या शेअरचा भाव 6.27 टक्क्यांनी, विक्रम सोलार कंपनीच्या शेअरचा भाव 5.45 टक्क्यांनी, स्टर्लिंग अँड विल्सन एनर्जी कंपनीच्या शेअरचा भाव एक टक्क्याने कोसळला. सकाळी या कंपन्यांच्या शेअरच्या भावात मोठ्या प्रमाणात घट झाली होती. मात्र नंतर या कंपन्यांनी आमच्या कामकाजावर या निर्णयाचा परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर शेअरच्या भावात बरीच सुधारणा झाली. ट्रम्प प्रशासनाने सर्वच देशाविरोधात सरसकट दहा टक्के आयात शल्क लावले असताना आता लावलेले शुल्क हे अतिरिक्त आहे. भारत सरकार भारतातील सौर ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांना अनावश्यक अनुदान देत असल्यामुळे या कंपन्यांची उत्पादने तुलनेने स्वस्त आहेत. ती अमेरिकेत विकली जातात असे ट्रम्प प्रशासनाचे म्हणणे आहे. भारत आणि अमेरिका व्यापार करार होणार असतानाच अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने शुल्काविरोधात निर्णय दिल्यानंतर भारताने चर्चा स्थगित केली आहे. यावर ट्रम्प प्रशासनाने नापसंती व्यक्त केली आहे. करारातून अंग काढून घेणार्या देशाविरोधात अधिक शुल्क लावू अशी धमकी दिलेली आहे. त्याचाच परिणाम म्हणून हे शुल्क लावले असल्याचे समजले जाते. मात्र तसे औपचारिक स्पष्टीकरण ट्रम्प प्रशासनाने केलेले नाही. यावर भारतातील वाणिज्य मंत्रालयाने आम्ही या विषयाचा अभ्यास करत आहोत अशी प्रतिक्रिया दिली आहे. कंपन्यांच्या कामकाजावर परिणाम नाही – ट्रम्प प्रशासनाने भारतीय सौर ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या उत्पादनावर भरमसाठ शुल्क लावले असले तरी त्याचा भारतातील कंपन्यांच्या कामकाजावर किंवा महसुलावर कसलाही परिणाम होणार नसल्याचे या कंपन्यांनी स्पष्ट केले आहे. भारत सरकारने देशांतर्गत सौरऊर्जा क्षेत्राला बळकटीत दिली आहे. त्यामुळे आम्हाला देशात मोठ्या प्रमाणात काम मिळत आहे. त्याचबरोबर अमेरिकेशिवाय इतर देशाकडून आमच्या उत्पादनांना मागणी आहे. त्यामुळे अमेरिकेच्या निर्णयाचा आमच्या महसुलावर कसलाही परिणाम होणार नाही असे या कंपन्यांच्या प्रमुखांनी स्पष्ट केले.