बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाचा पहिला उमेदवार जाहीर

वर्धा : राज्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. विधानसभा निवडणूका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. यादरम्यान प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी विधानसभेसाठीचा पहिला उमेदवार जाहीर केला आहे. बीआरएस मधून प्रहारमध्ये प्रवेश केलेल्या जयकुमार बेळखडे यांच्या नावाची आर्वी विधानसभेवर प्रहारचा उमेदवार म्हणून नाव घोषित करण्यात आले आहे.
तिसरी आघाडी
महाराष्ट्रात प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू, स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी निर्माण केलेल्या तिसऱ्या आघाडीकडून नेमक्या किती जागा लढविल्या जातात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देवळी, हिंगणघाट आणि वर्धा या चारही विधानसभा क्षेत्रात तिसऱ्या आघाडीकडून उमेदवार रिंगणात उतरविले जाणार असण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
भावी मुख्यमंत्री तिसऱ्या आघाडीशिवाय ठरणार नाही
आमचे दहा जरी आमदार निवडून आले तर आम्ही गणपती बसविल्याशिवाय राहणार नाही, असा टोला लगावत महाराष्ट्रात भावी मुख्यमंत्री तिसऱ्या आघाडीशिवाय ठरणार नसल्याचे संकेत आमदार बच्चू कडूंनी दिले आहेत.





