Sharad Pawar : आधी मुख्यमंत्र्यांना पत्र, आता शरद पवार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; ‘हे’ आश्वासन देत म्हणाले…
Sharad Pawar : दुष्काळाच्या प्रश्नावर यापूर्वीच मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे काही मागण्या मांडल्याचे शरद पवारांनी सांगितले.

Sharad Pawar : महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून विविध मागण्या केल्या आहेत. आता शरद पवार स्वतः दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करत असून, पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे जाहीर केले.
पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना शरद पवारांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी दुष्काळी परिस्थिती आणि त्यातून निर्माण झालेल्या समस्यांबाबत राज्य सरकारशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. हे संकट मोठे आहे. त्यामुळे मी राज्य सरकारशी बोलत आहे. काही तालुके अद्याप दुष्काळग्रस्तांच्या यादीतून वंचित आहेत. पुरंदरसारख्या तालुक्यांचाही दुष्काळग्रस्त यादीत समावेश झाला पाहिजे.” अशी भूमिका शरद पवारांनी मांडली.
यावेळी त्यांनी आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुरंदरसह दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या समस्या त्यांच्यासमोर मांडणार असल्याचे सांगितले. तसेच दुष्काळी परिस्थितीवर सविस्तर चर्चा करून त्यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘तुमच्या समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार’
दुष्काळाच्या प्रश्नावर यापूर्वीच मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे काही मागण्या मांडल्याचे शरद पवारांनी सांगितले. सरकारकडून लोकांच्या भावना आणि परिस्थिती समजून घेऊन निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचेही त्यांनी नमूद केले.
“तुम्हीही माहिती घ्या, मीही गावागावात जाऊन परिस्थितीची माहिती घेतो, असे मी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. दुष्काळी परिस्थितीबाबत तुम्ही अनेक मुद्दे मांडले आहेत. मुख्यमंत्र्यांची लवकरच भेट घेऊन हे सर्व मुद्दे त्यांच्यासमोर मांडणार असून, त्यावर मार्ग काढला जाईल.” असे आश्वासन शरद पवारांनी शेतकऱ्यांना दिले.
दरम्यान, राज्य सरकारने २६५ तालुक्यांमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र, काही भागांचा समावेश न झाल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा दुष्काळी भागांचा दौरा आणि मुख्यमंत्र्यांसोबत होणारी संभाव्य भेट महत्त्वाची ठरणार आहे.






