आधी जनतेवर मोठा घाव, आता श्रेय घेण्याचा प्रयत्न; कॉंग्रेसचा मोदींवर हल्लाबोल

नवी दिल्ली : घटनात्मक संस्था असणाऱ्या जीएसटी परिषदेने कररचनेत सुधारणा केल्या. मात्र, त्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ स्वत:कडेच घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असे टीकास्त्र कॉंग्रेसने सोडले. मोदींनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणावर विरोधकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या. आधी प्राप्तिकर सवलत आणि आता जीएसटी सुधारणा या दुहेरी निर्णयांमुळे नागरिकांची २.५ लाख कोटी रूपयांची बचत होईल, असे मोदींनी म्हटले.
त्यावरून कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी जोरदार पलटवार केला. कॉंग्रेसने सुटसुटीत जीएसटीचा आग्रह धरला होता. मात्र, मोदी सरकारने ९ विविध टप्प्यांच्या माध्यमातून गब्बर सिंग टॅक्स लादला. त्यातून ८ वर्षांत तब्बल ५५ लाख कोटी रूपयांची वसुली करण्यात आली. आता मोदी २.५ लाख कोटी रूपयांच्या बचत उत्सवाविषयी बोलत आहेत. आधी जनतेवर मोठा घाव घालून आता किरकोळ बँड-एड लावले जात आहे.
जनतेसाठी आवश्यक असणाऱ्या अनेक वस्तूंवर जीएसटी लावण्यात आला. जनता ते कधीच विसरणार नाही. सरकारने खरेतर जनतेची माफी मागायला हवी, अशी मागणी त्यांनी केली. कॉंग्रेसने सातत्याने जीएसटीशी संबंधित अनेक समस्यांकडे लक्ष वेधले. आता करण्यात आलेल्या सुधारणा अपुऱ्या वाटतात. विकासदर वाढीसाठी खासगी गुंतवणूक अत्यावश्यक आहे.
त्या गुंतवणुकीला ८ वर्षे विलंबाने झालेल्या सुधारणांमुळे चालना मिळणार की नाही ते अद्याप समजायचे आहे, अशी उपरोधिक टिप्पणी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही कॉंग्रेसच्या सुरात सूर मिसळला. जीएसटी दर कपातीचे श्रेय घेण्याचा खटाटोप मोदी सरकार करत आहे.





