Hingoli : हिंगोलीत जवानाच्या कुटुंबावरच गोळीबार; पत्नीचा मृत्यू, दोन चिमुकले गंभीर

Hingoli – हिंगोलीत एका जवानाने आपल्याच कुटुंबावर बेछूट गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या गोळीबारात जवानाच्या पत्नीचा मृत्यू, तर दोन चिमुकल्यांसह आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी घडली. या गोळीबाराचे नेमके कारण समजू शकले नाही. या प्रकरणी पोलिस तपास करीत आहेत.
राज्य राखीव पोलीस दलाचा जवान विलास मुकाडे याने आपल्या कुटुंबावर बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर दीड वर्षाच्या चिमुकल्यासह सासू आणि आणखी एक जण जखमी झाले असून, त्यांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. तिघांचाही प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ही घटना नेमकी कोणत्या कारणामुळे घडली, हे अद्याप समोर आले नाही. यासंबंधीचा तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान, गोळीबारानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. आता आरोपीच्या शोधासाठी पोलिस पथक रवाना झाला आहे.





