आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या पुतण्याच्या घरासमोर गोळीबार; राजकीय वर्तुळात खळबळ

Dharashiv News| राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या सोनारी येथील घरासमोर मध्यरात्री दोन अज्ञात व्यक्तींनी हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गोळीबार कोणी केला हे अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलीस त्याचा योग्य तपास करतील अशी अपेक्षा धनंजय सावंत यांनी व्यक्त केली आहे.
तानाजी सावंत यांचे पुतणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या सोनारी येथील घरासमोर गुरुवार व शुक्रवारच्या मध्यरात्री १२:३७ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन व्यक्तींनी हवेत गोळीबार केला. त्यानंतर तेथून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन व परंडा पोलीस यांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला आहे.
महायुतीच्या सभेआधी घडलेल्या घटनेमुळे उडाली खळबळ
विशेष म्हणजे 14 सप्टेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परांड्यात सभा पार पडणार आहे. त्यापूर्वीच ही घटना घडली असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मागील, दोन दिवसांपूर्वी मंत्री तानाजी सावंत आणि काही शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली होती. तानाजी सावंत हे खंडेश्वरी प्रकल्प पूजनाच्या कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी हा प्रकार घडला होता. यावेळी धनंजय सावंत यांनी शेतकऱ्यांना दमदाटी केल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर शेतकऱ्यांनी धनंजय सावंत आणि तानाजी सावंत यांच्याकडून धोका असल्याची भीती देखील व्यक्त केली होती. यादरम्यान आता धनंजय सावंत यांच्याच निवासस्थानाबाहेर गोळीबाराची घटना घडली आहे.





