Kaps Cafe Firing – प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडातील ‘कॅप्स कॅफे’ या नव्या रेस्टॉरंटवर बुधवारी मध्यरात्री गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. राष्ट्रीय तपास यंत्रणेचा (एनआयए) मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आणि बब्बर खालसा इंटरनेशनल (बीकेआय) शी संबंधित हरजीत सिंह लड्डी याने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, पोलिसांनी परिसर सील करून तपास सुरू केला आहे. या गोळीबाराचा व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने पसरत आहे. व्हिडिओत एक व्यक्ती रात्रीच्या वेळी कारमधून उतरून कॅफेच्या खिडक्यांवर अंधाधुंद गोळीबार करताना दिसत आहे. सूत्रांनुसार, हरजीत सिंह लड्डीने कपिल शर्मा यांच्या काही जुन्या वक्तव्यांच्या आधारावर हा हल्ला घडवल्याचा दावा केला आहे. मात्र, कपिल शर्मा किंवा त्यांच्या टीमकडून याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅफेवर अनेक राउंड्स गोळीबार झाला. कॅफेच्या बाहेरील भागासह आजूबाजूच्या इमारतींवरही गोळ्यांचे निशान आढळले आहेत. पोलिस आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून, सीसीटीव्ही फुटेज आणि गोळीबारात वापरलेल्या खोक्यांचा तपास सुरू आहे. परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे. कपिल शर्मा आणि त्यांच्या पत्नी गिन्नी चतरथ यांनी नुकतेच या कॅफेचे भव्य उद्घाटन केले होते. उद्घाटनाच्या काहीच दिवसांत हा हल्ला घडल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कपिल आणि गिन्नी यांनी उद्घाटनाच्या वेळी इन्स्टाग्रामवर कॅफेच्या सुंदर छायाचित्रांचा संग्रह शेअर केला होता, ज्यावर चाहत्यांनी त्यांना शुभेच्छांचा वर्षाव केला होता. हरजीत सिंह लड्डी हा भारताच्या एनआयएचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी असून, त्याचा बब्बर खालसा इंटरनेशनल या खालिस्तानी दहशतवादी संघटनेशी संबंध आहे. या प्रकरणाचा तपास तीव्रतेने सुरू असून, पोलिस लवकरच आरोपींपर्यंत पोहोचतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.