Fire News : दिवाळीच्या आनंदावर विरजण! रॉकेट थेट बेडरूममध्ये घुसलं अन् तीन फ्लॅट आगीच्या भक्ष्यस्थानी
Fire News : दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना फटाक्यांच्या निष्काळजी आतषबाजीमुळे रायगड जिल्ह्यातील पेण शहरात भीषण दुर्घटना घडली आहे.

Fire News : दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत असतानाच रायगड जिल्ह्यातील पेण शहरात फटाक्यांमुळे आगीची गंभीर दुर्घटना घडली आहे. लक्ष्मीपूजनाच्या रात्री फटाक्यांचे रॉकेट थेट एका फ्लॅटच्या बेडरूममध्ये घुसल्याने आग लागली. या आगीत सिद्धिविनायक अपार्टमेंटमधील तीन फ्लॅटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, एका फ्लॅटमधील सर्व सामान जळून खाक झाल्याची माहिती आहे. (Fire News)
बेडशीटने पेट घेतला अन् आग पसरली
पेण शहरातील उत्कर्ष नगर परिसरातील सिद्धिविनायक अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. प्रेम तेलवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मीपूजनाच्या रात्री परिसरात फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. त्याचवेळी एक रॉकेट थेट त्यांच्या फ्लॅटच्या बेडरूममध्ये घुसले. बेडवर असलेल्या बेडशीटवर रॉकेट पडल्याने तिने पेट घेतला. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण फ्लॅट आगीच्या विळख्यात सापडला. (Fire News)
तीन फ्लॅटचे मोठे नुकसान
या आगीची झळ शेजारील फ्लॅटलाही बसली. विजय प्रसाद आणि अमित ईगावले यांच्या फ्लॅटचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रेम तेलवणे यांचा फ्लॅट पूर्णतः जळून खाक झाल्याची माहिती आहे. (Fire News)
लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच घडलेल्या या दुर्घटनेमुळे तीन कुटुंबांच्या दिवाळीच्या आनंदावर विरजण पडले आहे. फटाक्यांच्या एका रॉकेटमुळे कुटुंबांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. (Fire News)
मुंबईत फटाक्यांमुळे आगीच्या १३७ हून अधिक घटना
दरम्यान, मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये गेल्या २४ तासांत फटाक्यांमुळे १३७ पेक्षा अधिक आगीच्या घटना घडल्याचे वृत्त आहे. या घटनांनंतर महापालिका प्रशासन सतर्क झाले असून, रॉकेटसारख्या हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर बंदी घालण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. (Fire News)
Fire News : चिंबळी फाट्यावर कंपनीला भीषण आग; साहित्य, यंत्रसामग्री जळून खाक





