पुणे जिल्हा | जुन्या वडाच्या झाडांना आग

नारायणगाव (वार्ताहर)- पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० वरील नारायणगाव येथील जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजारच्या पश्चिम बाजूला व प्रणव मंगल कार्यालयाच्या समोरील बाजूस असलेल्या साठ वर्षावरील वडाच्या जुन्या झाडांना शनिवारी (दि.२७) रात्री समाजकंटकांनी आग लावली. यात वडाच्या झाडांचे मोठे नुकसान झाले आहे. पर्यावरणप्रेमींनी वडाच्या झाडांना आग लावणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
वडाच्या झाडाला रात्री आठ वाजता लागलेल्या आगीची माहिती सामाजिक कार्यकर्ते आदिल शेख यांनी तर पहाटे चार वाजता लागलेल्या आगीची माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे हवालदार पोपट मोहरे व गोरक्ष हासे यांनी पोलीस पाटील सुशांत भुजबळ यांना दिली. नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल दत्ता ढेंबरे, शैलेश वाघमारे, पोलीस पाटील सुशांत भुजबळ, जुन्नर वनरक्षक ज्ञानेश्वर पवार, ग्रामसुरक्षा दलाचे जवान आदित्य डेरे, शंतनू डेरे, सूरज चव्हाण, रोहन भुजबळ, ऋषिकेश भुजबळ, राजकुमार चव्हाण, संतोष रोकडे,
आली नासीर सय्यद, विक्रांत कोल्हे, मयूर कोल्हे यांनी ताबडतोब झाडावर संपूर्ण बाजूने पाणी मारून आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जुन्नर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने आग नियंत्रणात आणण्यात यश मिळवले. एकीकडे जुन्नर अग्निशमन केंद्र व वनविभाग झाडांचे जतन करत असताना काही लोक झाडांना आग लावण्याचे काम करत आहे. त्यामुळेच पर्यावरणाचा समतोल ढासळत चाललेला असल्याची खंत पर्यावरण प्रेमींनी बोलून दाखवली.
राष्ट्रीय महामार्गच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर दुतर्फा झाडे लावणे बंधनकारक असूनही ठेकेदार झाडे लावत नाहीत. त्यामुळे एका बाजूला रस्त्यांचा विकास होत असला तरी दुसऱ्या बाजूला पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० च्या अधिकाऱ्यांना हे सर्व माहीत असूनही जाणीवपूर्वक डोळेझाक करीत आहेत.
याशिवाय पुणे नाशिक बाह्यवळण महामार्गापासून नारायणगावातून जाणाऱ्या जुन्या महामार्गालगत अनेक छोटे मोठे व्यावसायिक, चहा टपरीवाले, फळ विक्रेते अनधिकृतपणे व्यवसाय करीत आहे. ग्रामपंचायत वारूळवाडी, सार्वजनिक बांधकाम विभाग, नारायणगाव पोलीस स्टेशन व राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी कारवाई करीत नाही. प्रत्येक जण एकमेकांवर जबाबदारी ढकलून देत आहे.





