पुणे | भांडारकर रस्त्यावरील इमारतीच्या गच्चीवर आग

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – भांडारकर रस्त्यावरील “करण सोहेल’ या सात मजली इमारतीच्या गच्चीवर आग लागल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. याची माहिती १२ वाजून ५८ मिनिटांनी अग्निशमन कक्षाला मिळाली. लगेचच एरंडवणा, कोथरूड येथील वाहनांसह एक वॉटर टँकर घटनास्थळी रवाना करण्यात आले. २० मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन विभागाला यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार या इमारतीच्या गच्चीवर पत्रा व स्लायडिंगचे बांधकाम असलेल्या ऑफिसला आग लागल्याची माहिती मिळाली होती. जवानांनी घटनास्थळी पोहोचताच आगीच्या ठिकाणी कोणी अडकले नसल्याची खात्री करुन घेत, होज पाइपने पाण्याचा मारा सुरू करुन सुमारे वीस मिनिटांत आग आटोक्यात आणली.
या इमारतीचा वापर हा व्यावसायिक असून येथे अनेक कार्यालये आहेत. जवानांनी अनेक कामगारांना या ठिकाणाहून बाहेर काढले. या आगीचे नेमके समजू शकलेले नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन अधिकारी राजेश जगताप, गजानन पाथ्रुडकर यांच्यासह २० जवान घटनास्थळी दाखल झाले होते.




