थायलंडमध्ये अग्नितांडव! नाईट क्लबच्या भीषण आगीत 40 जणांचा मृत्यू; अनेकांची प्रकृती गंभीर

बँकॉक : थायलंडमध्ये मोठ्या अग्नितांडवाची दुर्घटना घडली आहे. नाईट क्लबमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली असून या आगीत तब्बल 40 जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. तर 10 जण गंभीररीत्या भाजले असल्याचेही म्हटले जात आहे.
चोनुबरी प्रांतातील सट्टाहिप जिल्ह्यातील नाईट क्लबला ही आग लागली असून हे थायलंडची राजधानी बँकॉकच्या आग्नेय भागात आहे. कर्नल वुटीपोंग सोमजाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, माऊंटन बी नाईट क्लबमध्ये काल रात्री एक वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली.
मृतांमध्ये सहभागी असलेले सर्वजण थायलंडचे नागरिक असल्याचे सांगण्यात येत आहे. बँकॉक पोस्टने मदत आणि बचाव कार्यात गुंतलेल्या सावंग रोजनाथमस्थान फाऊंडेशनचा हवाला देत वृत्त दिले आहे की, आगीत होरपळून 40 लोकांचा मृत्यू झाला आहे. हा नाईट क्लब प्रसिद्ध होता. येथे मोठ्या संख्येने भारतीय पर्यटकही येत असत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आगीच्या व्हिडिओमध्ये लोक सुरक्षित स्थळी धावताना दिसत आहेत. जीव वाचवण्यासाठी लोक ओरडताना दिसत होते. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.





