Pune District : वीज तारांच्या घर्षणाने आग; २० एकर ऊस जळून खाक
Pune District : दुपारच्या सुमारास उसाच्या शेतात अचानक आग लागली. उसाचे पीक उंच आणि दाट असल्याने आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले.

सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील खंडोबाचीवाडी येथील घुमट वस्ती परिसरात मंगळवारी (दि. २७) दुपारी उसाच्या शेताला विद्युत वाहक तारा तसेच क्षेत्रातील असलेल्या डीपीमुळे आग लागून सुमारे २० एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला. या आगीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. विद्युत तारांच्या घर्षणामुळे आग लागली असावी, अशी शक्यता स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दुपारच्या सुमारास उसाच्या शेतात अचानक आग लागली. उसाचे पीक उंच आणि दाट असल्याने आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. आगीचा वेगाने फैलाव झाल्याने मोठ्या क्षेत्रातील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. अनेक महिन्यांच्या मेहनतीने वाढवलेले ऊस पीक डोळ्यादेखत जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
आधीच पाण्याची टंचाई, त्यात आगीचे संकट!
बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाअभावी आणि पाण्याच्या टंचाईमुळे शेतकरी आधीच अडचणीत सापडले आहेत. उपलब्ध पाण्यावर ऊस पीक जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच आगीच्या या संकटामुळे त्यांच्या कष्टांवर पाणी फिरले आहे. ऊस हे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन असल्याने या घटनेमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.
नानासो यशवंत दगडे, दादासो यशवंत दगडे, तुळशीराम साहेबराव येळे, मयूर सखाराम गडदरे, बाळासो आबाजी येळे, शालन लोखंडे, लक्ष्मण आणंदराव लोखंडे, आप्पा बिरू महानवर, शिवाजी यशवंत दगडे, आनंदाराव यशवंत दगड, संपत बिरू महानवर, जन्याबा भिवा ठोंबरे, संतोष उमाजी येळे, वामन बाबा दगडे या शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले. या क्षेत्रात उभे असलेल्या डीपी मुळेच यापूर्वीही तीन वेळा शेतकऱ्यांचा ऊस आगीच्या भक्षस्थानी पडलेला आहे या क्षेत्रातील उभा असलेला डीपी त्वरित इतरत्र हलवावा अशी देखील मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.





