शिरूर : घरगुती वादातून स्वतःच्याच झोपडीची राखरांगोळी

शिरूर : घरगुती व प्रापंचिक कारणावरून रागाच्या भरात पतीने स्वतःची झोपडी पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि. १४) रात्री टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे घडला आहे. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत उषा संतोष पवार (वय-२७) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात पती संतोष वसंत पवार याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
नेमकं काय घडलं?
मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील बोटा येथील रहिवासी असलेले पवार कुटुंब उदरनिर्वाहासाठी टाकळी हाजी येथील शिनगरवाडी जवळ राहत आहे. भूमिहीन असल्याने परिस्थितीवर मात करण्यासाठी मोलमजुरीचे काम करून पत्नी संसाराचा गाडा हाकत आहे. दरम्यान, सायंकाळी जेवण करत असताना उषा हिने माझ्या सोबत मजुरीच्या कामाला चला असे म्हटल्याचा राग पती संतोषला आल्याने त्याने स्वतःचीच झोपडी पेटवून दिली.
झोपडी पेटल्यानंतर शेजाऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात आली नाही. शेतकऱ्यांनी याबाबत माजी सरपंच दामूशेठ घोडे यांना कळविताच ते तात्काळ पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले. मात्र पोलिस आल्याची चाहुल लागताच संतोष तेथून पसार झाला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दिपक कारंडे करीत आहेत.
पतीला दारूचे व्यसन असल्याने वारंवार त्रास
पतीला दारूचे व्यसन असल्याने वारंवार त्रास देत आहे. आज ना उद्या सुधारेल या आशेवर आजवर आवाज उठविला नाही. स्वतःच्या कष्टाने मुलीचे लग्न केले असून मुलगा आश्रमशाळेत शिकत आहे. दररोज मीच कामाला जायचे, संतोष हा मात्र फक्त दारु पिऊन घरी गोंधळ घालत असतो. घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले असून मला जीवे मारण्याची धमकी दिल्याने पोलिसांत तक्रार द्यावी लागली, असे उषा पवार यांनी सांगितले आहे.





