पुणे | फिनिक्स माॅलमधील बंद हॉटेलमध्ये आग

पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- नगर रस्त्यावरील फिनिक्स माॅलमधील तिसऱ्या मजल्यावर एक बंद हॉटेल आहे. तेथे शुक्रवारी दुपारी आग लागली. येथील फर्निचर, इलेक्ट्राॅनिक्स वस्तू जळून खाक झाल्या. मॉलमधील फायर सिस्टीम आणि अग्निशमन दलाने ही आग ४५ मिनिटांत आटोक्यात आणली. घटनेवेळी मॉलमध्ये सुमारे साडेतीन हजार नागरिक होते. तेथील कर्मचारी आणि अग्निशमन दलाने या सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढले.
अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी ३ वाजून ३३ मिनिटांनी मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरील डी बिल्डिंगमधील टी-वन शॉपमधील बंद हॉटेलला आग लागल्याची माहिती मिळाली. यानंतर येरवडा, धानोरी, हडपसर, आणि भवानी पेठे अग्निशमन दल केंद्रातील ५ फायरगाड्या व दोन पाण्याचे टँकर पाठविण्यात आले.
तत्पूर्वी मॉलमधील कर्मचार्ऱ्यांनी फायर सिस्टीम सुरू केली होती. ३ वाजून ४५ मिनिटांनी अग्निशमन जवान दाखल झाले होते. त्यावेळी १० अधिकारी आणि ५० जवानांनी सातत्याने पाण्याचा मारा सुरू केला आणि सुमारे ४५ मिनिटांत आग आटोक्यात आणली. ही कामगिरी मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे, दांगट, परतूडकर, रामटेके, सोनावणे, वायकर, वानखेडे, पवार, जाधव, यांच्या पथकाने केली.
फिनिक्स मॉलमधील फायर सिस्टिम कार्यान्वित असल्याने धोका टळला. अग्निशमन दलाचे वेळोवेळी होणारे मॉकड्रील, व्याख्याने तसेच फायर सिस्टम अद्ययावत ठेवण्यासाठी दलाकडून घेतलेली केलेली सूचना व दक्षता याचा आज मोठा उपयोग झाला. यावेळी मॉल मधील ग्राहक व कर्मचारी वर्ग सुरक्षित राहिला. देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी





