Ukrainian drone attack : युक्रेनच्या ड्रोनमुळे रशियातल्या तेल प्रकल्पाला आग; हल्ल्यात २ जण ठार
युक्रेनने रशियावर ड्रोन हल्ले सुरूच ठेवले असून आज करण्यात आलेल्या या ड्रोन हल्ल्यामुळे रशियाच्या दक्षिणेकडील एका प्रमुख तेल शुद्धिकरण प्रकल्पाला आग लागली.

Ukrainian drone attack – युक्रेनने रशियावर ड्रोन हल्ले सुरूच ठेवले असून आज करण्यात आलेल्या या ड्रोन हल्ल्यामुळे रशियाच्या दक्षिणेकडील एका प्रमुख तेल शुद्धिकरण प्रकल्पाला आग लागली. या हल्ल्यात किमान दोघे ठार झाल्याचे रशियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
आज रात्री, आमच्या लांब पल्ल्याचे ड्रोन रशियातील दोन तेल शुद्धीकरण कारखान्यांपर्यंत पोहोचले. या प्रत्येक हल्ल्यामुळे रशियाच्या युद्ध मशिनचे स्रोत कमी होत आहेत. शांततेच्या दिशेने आणखी एक पाऊल पडते आहे, असे युक्रेनचे अध्यक्ष वोलोदायमिर झेलेन्स्की यांनी रविवारी टेलिग्राम ॲपवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
युक्रेनच्या ड्रोनचे अवशेष पडल्यामुळे क्रिमियाच्या पूर्वेकडील क्रास्नोदार भागातील स्लावयान्सक-ना-कुबानी या तेल शुदधिकरण प्रकल्पाला आग लागली. हे अवशेष पडल्यामुळे एक जण ठार झाला, तर जवळच्या एका गावात एक जण जखमी झाला, असे स्थानिक अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
स्लोव्हियान्स्क येथील प्रकल्प हा दक्षिण रशियातील प्रमुख तेल शुद्धीकरण प्रकल्पांपैकी एक आहे. तसेच, रशियाच्या काळ्या समुद्रातील बंदरांमार्फत निर्यात होणाऱ्या इंधन तेल, नॅफ्था आणि सागरी इंधन या सारख्या पेट्रोलियम उत्पादनांचा हा एक प्रमुख स्रोत आहे.
युक्रेनच्या सीमेपासून सुमारे ७०० किलोमीटर अंतरावर असलेल्या यारोस्लाव्ह प्रदेशातील रशियाच्या दुसऱ्या तेल शुद्धीकरण कारखान्याला रात्रीच्या हल्ल्यांमध्ये लक्ष्य करण्यात आल्याचा दावा झेलेन्स्की यांनी केला. पण यारोस्लाव्ह रिफायनरीवर झालेल्या युक्रेनच्या हल्ल्याबाबत रशियाच्या अधिकाऱ्यांकडून तात्काळ कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
दुसरीकडे, रशियाच्या बेलगोरोड या सीमावर्ती प्रदेशात युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यात एक जण ठार झाला आणि दुसरा जखमी झाला.
दरम्यान, रशियाने रात्रीतून १४२ लांब पल्ल्याच्या स्ट्राइक ड्रोन आणि आठ क्षेपणास्त्रांनी युक्रेनवर हल्ला केला. त्यापैकी १२५ ड्रोन आणि सात क्षेपणास्त्रे पाडण्यात आली, असे युक्रेनच्या हवाई दलाने म्हटले आहे.





