Russia-Ukraine war : सेंट पीटर्सबर्गमधील तेल निर्यात टर्मिनलला आग; युक्रेनकडून तब्बल एक हजार ड्रोनचा रशियावर मारा
रशियाच्या तेलाशी संबंधित पायाभूत सुविधांवर होणाऱ्या या हल्ल्यांवरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टीका केली होती.

Russia-Ukraine war – युक्रेनने रविवारी रशियावर केलेल्या मोठ्या ड्रोन हल्ल्यात सेंट पीटर्सबर्ग येथील तेल निर्यात टर्मिनलला आग लागली. युक्रेनने रशियातल्या विविध ठिकाणांवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला केला. त्यात तब्बल एक हजार ड्रोनचा मारा करण्यात आला.
रशियाच्या तेलाशी संबंधित पायाभूत सुविधांवर होणाऱ्या या हल्ल्यांवरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टीका केली होती. त्यामुळे युक्रेन आणि अमेरिकेत तणाव वाढला असताना युक्रेनने हा मोठा ड्रोन हल्ला केला आहे.
युक्रेनच्या या हल्ल्यात एक जण ठार झाला आणि अन्य पाच जण जखमी झाले. या ड्रोन हल्ल्यामुळे सेंट पीटर्सबर्ग येथील तेल टर्मिनलला आणि शहरातील रुची तेल डेपोला आग लागली, असे स्थानिक गव्हर्नर अलेक्झांडर बेग्लोव यांनी सांगितले.
रशिनाच्या किरकोळ उत्पादनांच्या विक्रीचा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ओझोनचे एक लॉजिस्टिक्स केंद्र आणि स्थानिक टेक कंपनी व्हीकेचे एक डेटा सेंटरलाही लक्ष्य करण्यात आले होते.
युक्रेनने रशियाच्या १५ क्षेत्रांवर तसेच रशियाने आपल्या भूभागाला जोडून घेतलेल्या युक्रेनच्या क्रिमिया द्वीपकल्प आणि काळा समुद्रावर डागलेली १,०१५ ड्रोन नष्ट केल्याचा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे.
युक्रेनच्या ड्रोन हल्ल्याला रशियाने दिलेल्या प्रत्युत्तरामध्ये एक महिला आणि ६ वर्षांच्या मुलीसह किमान दोघे जखमी झाले. दोन अपार्टमेंट, १८ कार आणि शैक्षणिक संस्थेचेही नुकसान झाले, असे झापोरिझ्झियाच्या प्रादेशिक लष्करी प्रशासकांनी सांगितले.
रशियाकडूनही ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले
रशिया आणि युक्रेनने ऊर्जा युद्धबंदी केल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले असले, तरी रशियाकडून युक्रेनमधील तेलाशी संबंधित प्रकल्पांवर ७६ हल्ले केले गेल्याचे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.
निर्बंधांतून सवलत देताना केलेल्या कराराचे पालन रशियाकडून केले जात नाही. उलट तेलाच्या विक्रीतून मिळणारा प्रत्येक पैसा युद्धासाठी वापरला जातो आहे, हे अमेरिकेने बघायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी दिली आहे.





