ठाणे : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील एका खाजगी शाळेच्या मुख्याध्यापिकेविरुद्ध निवडणूक कर्तव्यातील निष्काळजीपणाप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. उल्हासनगर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आयोजित करण्यात आलेल्या अनिवार्य प्रशिक्षण सत्रांना शाळेतील २३ कर्मचारी गैरहजर राहिल्याने ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. उल्हासनगर महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे प्रमुख अजित रत्ना गोवारी यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, मुख्याध्यापिकेने निवडणूक कर्तव्यासाठी कर्मचाऱ्यांना पाठविण्याबाबतचे अधिकृत आदेश स्वीकारण्यास नकार दिला. परिणामी, शाळेतील सर्व २३ कर्मचारी प्रशिक्षण सत्राला अनुपस्थित राहिले. महापालिकेने यानंतर शाळा व्यवस्थापनाला कारणे दाखवा नोटीस बजावली. मात्र, त्यालाही कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही. तसेच, अधिकाऱ्यांनी मुख्याध्यापिकेशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सहकार्य मिळाले नसल्याचे सांगण्यात आले. या प्रकारामुळे निवडणूक तयारी प्रक्रियेत अडथळा निर्माण झाल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. पोलिसांनी मुख्याध्यापिकेविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 223 तसेच लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम १३४(१) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.