ओयोने केला कोट्यवधींचा ‘खेळ’? संस्थापक रितेश अग्रवाल यांच्याविरुद्ध तक्रार दाखल, प्रकरण काय?

FIR against OYO, founder Ritesh Agarwal | ओयो (OYO) या लोकप्रिय ट्रॅव्हल बुकिंग प्लॅटफॉर्मने चुकीची माहिती दिल्यामुळे जयपूरच्या ‘संस्कार रिसॉर्ट’ला तब्बल 2.66 कोटी रुपयांची जीएसटी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसनंतर संस्कार रिसॉर्टचे मदन जैन यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
त्यांनी ओयो आणि त्याचे संस्थापक रितेश अग्रवाल यांच्यासह कंपनीच्या इतर अधिकाऱ्यांविरोधात फसवणूक, विश्वासघात, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि गुन्हेगारी कट रचणे यासारखे गंभीर आरोप केले आहेत.
एफआयआरनुसार, ओयो आणि संस्कार रिसॉर्ट यांच्यात 18 एप्रिल 2019 रोजी 12 महिन्यांचा करार झाला होता. मात्र, ओयोने कराराच्या कालावधीपलीकडे म्हणजेच 2018-19, 2019-20 आणि 2020-21 या आर्थिक वर्षांमध्ये बुकिंग दाखवून जीएसटीमध्ये गोंधळ निर्माण केल्याचा आरोप रिसॉर्टकडून करण्यात आला आहे.
कागदोपत्री ओयोने फक्त 10.95 लाख रुपयांचा व्यवसाय संस्कार रिसॉर्टला दिला असल्याचे दर्शवले, ज्यावर रिसॉर्टने जीएसटी भरला. परंतु वास्तविक माहितीमध्ये ओयोने तब्बल 22.22 कोटी रुपयांचा व्यवसाय दाखवला, ज्यामुळे GST विभागाने 2.66 कोटी रुपयांचे दंडासहित बिल पाठवले आहे.
राजस्थान हॉटेल फेडरेशनचे अध्यक्ष हुसेन खान यांनी या प्रकारावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “ओयोने अशाच प्रकारे सुमारे 20 हॉटेल्सना वाढीव व्यवसायाचे बनावट आकडे देऊन जीएसटी नोटीसा पाठवल्या आहेत.” त्यांनी हे देखील स्पष्ट केले की, “चार वर्षांपूर्वी ओयोच्या मनमानी धोरणांविरोधात आम्ही 125 हॉटेल्सच्या माध्यमातून मोहीम राबवली होती.
आम्ही ओयो बुकिंग स्वीकारत नाही’ असे फलकही लावण्यात आले होते, अशी माहिती देखील त्यांनी दिली.
दरम्यान ओयोकडून स्पष्टीकरण देण्यात आले की, या प्रकरणाचा संबंध हॉटेलवाल्यांच्या जीएसटी वादाशी असल्याचे दिसते. हे शक्य आहे की त्याने वॉक-इन पाहुण्यांवर जीएसटी भरला नसावा आणि आता लक्ष विचलित करण्यासाठी ओयोला यात खोटे पाडण्याचा प्रयत्न करत आहे. आमच्या नोंदी स्पष्टपणे दर्शवतात की त्याची बहुतेक बुकिंग वॉक-इन होती, जी थेट त्याच्या स्वतःच्या कर्मचाऱ्यांनी प्रविष्ट केली असती. अशा परिस्थितीत बनावट बुकिंगला कोणताही आधार नाही. ही दिशाभूल करणारा एफआयआर लवकरच फेटाळला जाईल, असा आम्हाला विश्वास आहे.
ही तक्रार रितेश अग्रवालच्या नावाने नसून ‘अज्ञात व्यक्ती’विरोधात दाखल करण्यात आली आहे, असेही स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.





