पिंपरी | वाकडमधील गोल्डन केअर हॉस्पिटलमध्ये आर्थिक गैरव्यवहार
पिंपरी, (प्रतिनिधी) – हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यानंतर रुग्णांकडून येणारी रक्कम स्वतःच्या बँक खात्यावर घेऊन हॉस्पिटलची ३ लाख ७८ हजारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एका महिला कर्मचाऱ्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ही घटना सहा महिन्यांपासून वाकड-भुमकर वस्ती येथील गोल्डन केअर हॉस्पिटलमध्ये घडली.
याबाबत हॉस्पिटलचे संचालक डॉ. किरण रंगराव मुळे (वय ४३, रा. सी-१०३, रॉयल ग्लोरीस भुमकरवस्ती, वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन वाल्हेकरवाडी येथे राहणाऱ्या एका महिला आरोपीवर गुन्हा दाखल झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. मुळे यांच्या हॉस्पिटलमध्ये महिला आरोपी फ्रॅट डेक्स स्टाफ म्हणून नोकरीस होती.
तीने हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यानंतर रुग्णांकडून येणारी रक्कम हॉस्पिटलच्या बँक खात्यावर न घेता स्वतःच्या विविध बँक खात्यावर वेळोवेळी घेतली. मात्र, ही बाब डॉ. मुळे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली.





