Pimpri : सततच्या वाहतूक कोंडीमुळे कामशेत बाजारपेठेची ‘आर्थिक कोंडी’

कामशेत : पवन मावळ, नाणे मावळ व परिसरातील जवळपास सत्तर गावातील नागरिकांसाठी प्रमुख बाजारपेठ म्हणून कामशेत शहरातील बाजारपेठेकडे पाहिले जाते. मात्र अतिक्रमणाच्या विळ्यात अडकल्याने व सततच्या वाहतूक कोंडीमुळे येथील दुकानदारांची आर्थिक कोंडी होत आहे. वाढते अतिक्रमण व वाहतूक कोंडी यामुळे इथे येणारे ग्राहक दुसरीकडे जात असल्याचे स्थानिक दुकानदार सांगत आहेत.
ग्रामीण मावळची मुख्य बाजारपेठ म्हणून कामशेत शहराची ओळख आहे. कामशेतमध्ये भाताच्या गिरण्या, लग्न बस्त्याची प्रमुख दुकाने, सराफ बाजारपेठ प्रसिद्ध आहे. परंतु इथे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे बाजारपेठेचे आर्थिक नुकसान होत आहे. पार्किंगची सोय नसल्याने, वाहतूक कोंडी होत असल्याने व रस्ता अरुंद असल्याने हल्ली इथे येणारे ग्राहक वडगाव, तळेगाव, लोणावळा किंवा थेट पिंपरी-चिंचवडकडे धाव घेत आहेत.
पार्किंगची सोय नसल्याने ग्राहक संख्येवर विपरीत परिणाम झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जागा पार्किंगसाठी उपलब्ध होणे गरजेचे आहे. अतिक्रमण हेच वाहतूक कोंडीचे कारण आहे, असे स्थानिक दुकानदार मच्छिंद्र कदम यांनी सांगितले. तर, पार्किंगसोबत वडीवळेचा रेल्वे भुयारी मार्गामुळे जुनी बाजारपेठ ओस पडली आहे. हा रस्ता पूर्ववत सुरू झाला पाहिजे, अशी मागणी संदेश भटेवरा यांनी केली.
नागरिक म्हणतात…
१. पार्किंगची सोय नसल्याने वाहन रस्त्यावर उभे करावे लागते.
२. वाहतूक पोलीस कर्मचारी लगेच ऑनलाइन दंड आकारतात.
३. दुचाकीवरून खरेदीला गेले तरीही वाहतूक कोंडीत वेळ जातो.
४. वेळ व दंड वाचावा यासाठी इतर शहरात जाणे सोइचे ठरते.
५. पुलाच्या दोन्ही बाजूस सर्व्हिस रोड हा पार्किंगचे ठिकाण बनलाय.
अतिक्रमण वाहतूक कोंडीचे मुख्य कारण
बाजारपेठेतील अनेक दुकानदारांची दुकाने रस्त्यावर आली आहेत. रात्रीची वेळ साधून अनेक दुकानदार दुकानाचे समोरील बांधकाम वाढवतात. लहान विटांच्या सहाय्याने दुकान खोल्यांचे तात्पुरते बांधकाम केले जाते. जेणेकरुन भविष्यात अतिक्रमण काढण्याची वेळ आली तरीही नुकसान होणार नाही. अतिक्रमणाचा विषय ऐरणीवर येईपर्यंत या अनधिकृत खोल्यांतून आर्थिक उत्पन्न मिळत राहते. अशा अतिक्रमणांवर वेळीच कारवाई होणे आवश्यक आहे.





