आर्थिक : म्यूल बँक खात्याचे धोके?
सायबर फसवणूक करणारे वेगवेगळ्या क्लृप्त्या नेहमीच वापरत असतात. त्यापैकीच एक म्हणजे म्यूल बँक खाते. म्यूल बँक (Mule Accounts) खात्याद्वारे कशी फसवणूक होते आणि आपण कसे सावध राहिले पाहिजे, त्याबाबत...

– डॉ. डी. एस. काटे
Mule Accounts : सायबर फसवणूक करणारे वेगवेगळ्या क्लृप्त्या नेहमीच वापरत असतात. त्यापैकीच एक म्हणजे म्यूल बँक खाते. म्यूल बँक (Mule Accounts) खात्याद्वारे कशी फसवणूक होते आणि आपण कसे सावध राहिले पाहिजे, त्याबाबत…
‘म्यूल अकाउंट’ हा शब्द (Mule Accounts) बर्याच लोकांनी आतापर्यंत वाचलाही नसेल आणि कानावरही पडला नसेल. याचा अर्थ आहे की, दुसर्यास भाड्याने अर्थात काही रक्कम घेऊन वापरास दिलेले आपले स्वतःचे बँक खाते! अर्थातच सायबर गुन्हेगार रक्कम मिळण्यासाठी किंवा ती रक्कम वेगळ्या खात्यावर वळवून या म्यूल खात्याचा वापर करतात.
दुसर्याचे पैसे आपल्या खात्यावर घेणे, आपल्या खात्यातून (Mule Accounts) ते पैसे दुसर्याला पुढे पाठवणे किंवा रोख स्वरूपात देणे आणि यातून 10 ते 20 टक्क्यांपर्यंत कमिशन रक्कम मिळवणे यासाठी अशा खातेदाराचा वापर केला जातो.
गरजू/सुशिक्षित बेकार/अवैध धंदे करणारे आणि आर्थिक ज्ञान नसणारे लोक यास बळी पडतात. पैसे दाम दुप्पट करणे त्याचबरोबर इतर इन्व्हेस्टमेंट स्कीम/पार्ट टाइम जॉब/किंवा डिजिटल अटक/घेतलेले कर्ज वाढवणे किंवा कर्ज मिळवून देणे/क्रेडिट कार्डवर आपल्याला नवीन सुविधा देणे/अशा प्रलोभने दाखवून हे लोक जाळ्यात उडत ओढतात. अर्थात, ते सर्व पैसे काळे असतात. व्यवहारही अवैध!
सरकारी धोरणानुसार बँकिंग व्यवस्था विस्तृत व तळागाळातील लोकापर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा मानस आहे. भारतामध्ये बँकिंग व्यवस्था 73 टक्के लोकापर्यंत पोहोचली असून जेवढा पैसा तेवढा विकास वेगाने होतो तेवढे धोकेही वाढत जातात.
आज डिजिटल युगामध्ये सायबर गुन्हेगारी वाढत आहे त्याचबरोबर नवीन संशोधनानुसार गुन्हेगार आपली नवीन कार्यपद्धती विकसित करत असल्याने करोडो रुपयांची दिवसभर फसवणूक होत असते. यामुळे आपणही दक्ष राहणे क्रमप्राप्त आहे.
आपल्या खात्यावर रक्कम मिळून थोडेफार पैसे त्यातून मिळत जरी असले तरी उंट ज्याप्रमाणे काटेरी झुडूप खातो तेव्हा त्याचे स्वतःचे रक्तही लागते, ते केवळ काटे टोचल्यामुळे. पण त्याला हे माहिती नसतं की आपलंच रक्त आपण काट्याबरोबर चघळतो. अशातला प्रकार म्यूल खातेदारांचा सध्या चालू आहे. अल्प रकमेमध्ये मोठे धोके असे खातेदार स्वीकारतात.
आमची उलाढाल खूप मोठी असल्यामुळे आयकर व वस्तू व सेवाकर हे आम्ही वैध मार्गाने दाखवू शकत नाही. तुमच्यासारख्या प्रामाणिक माणसाची आम्हाला जरूर आहे, अशी बतावणी केली जाते. त्यामुळे आम्ही तुमच्या खात्यावर असे पैसे पाठवतो आणि रक्कम वजा करून आपण ते पैसे द्यावे, अशी अट हे ठग घालतात. सरकारी योजनांचे भरपूर पैसे आपल्या नावावर टाकण्यात येतील असे गाजर दाखवतात.
अनेक एजंट तळागाळापर्यंत पोहोचले आहे. नोकरी/पार्ट टाइम जॉब/घरबसल्या पैसे कमवा /परदेशवारी मोफत अशा प्रकारची लालसा दाखवून या साखळी जाळ्यामध्ये खातेदारास ओढले जाते. केंद्रीय गृहमंत्र्याच्या पोर्टलवर अशा तक्रारी वाढत आहे. फसवणूक झालेल्या लोकांची माहिती गोळा करणे हे काम सध्या वेगाने चालू आहे.
वाढत्या फसवणुकीच्या तक्रारींमुळे सरकारची डोकेदुखी वाढत आहे.फसवणूक झाल्यानंतर पोलिसात तक्रार करून व चौकशी करून एकदा गेलेला पैसा लगेच परत मिळत नाही त्याचबरोबर न्यायालयीन प्रक्रिया यामुळे माणसाचा वेळही जातो. हे खाते पूर्णपणे सील केले जाते. केवायसी/ आधार कार्ड यावरसुद्धा याचे परिणाम जाणवतात. एकंदरीत पुढे कर्ज काढणे, आर्थिक सुविधा घेणे व सरकारी योजनांचा फायदा घेणे या सर्व बाबींपासून खातेदार वंचित राहतो तसेच नावही खराब होते. शिवाय समाजामध्ये नाचक्की होते.
या उलट गुन्हेगारांना अर्थात (Mule Accounts) सायबर फसवणूकदारांना कडक व जलद शिक्षा होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. दोषी ठरले तर त्यांच्याकडे पैसेही द्यायला नसतात. कारण की फसवणुकीतून आलेल्या पैशाची त्यांनी विल्हेवाट अगोदरच लावलेली असते.
– दुसर्याच्या वापरासाठी व पैसे हस्तांतरित करण्यासाठी आपले स्वतःचे बँक खाते इतरांना देऊ नका.
– अज्ञात व्यक्तीकडून फोन आल्यानंतर स्वतःची माहिती अर्थात बँक खात्याचा पासवर्ड, ओटीपी व इतर माहिती देऊ नका.
– मोबाइल, व्हॉट्सअॅपवर अनोळखी साइटवरून आलेले संदेश व बिनकामाचे अॅप डाउनलोड करू नका.
– ऑनलाइन व्यवहार करताना स्वतःचे ओटीपी/फोन नंबर/पासवर्ड दुसर्या व्यक्तीस देऊ नये.
– तुमचे खाते काही दिवस पैशाच्या व्यवहारासाठी आम्ही भाड्याने घेतो व तुम्हाला काही रक्कम देतो आम्हाला केवायसी, एटीएम ओटीपी द्या, अशी विनवणी केल्यास स्पष्टपणे नकार द्यावा.
– तुम्हाला नोकरी, काम धंदा देतो, व्यवसायाला मदत करतो आणि आर्थिक मदत मिळाल्यानंतर तुमची भरभराट होईल, घरी बसून तुम्हाला पैसे कमावता येतील. काही रक्कम आम्ही जमा केल्यानंतर तुम्ही ती दुसर्या खात्यावर पाठवा. त्यातून कमिशन घ्या, आमचे अनेक ग्राहक श्रीमंत झालेले आहेत त्यांची खोटी यादीही सांगितली जाते. किंवा संवाद करून दिला जातो. तेही त्यांचेच माणसं असतात अर्थात गुन्हेगार! असे जाळे सायबर ठग टाकतात. यापासून सावधान राहा.
– आपल्या खात्यावर गुन्हेगारी अर्थात समाज विघातक कृत्य करणारे आणि यातून काळा पैसा पांढरा करणारे अनेक लोक यामध्ये गुंतलेले आहेत आणि त्याच्यासाठी आपल्या खात्याचा वापर करतात यातून आपणही गुन्हेगार होतो. दुसर्याला आपले खाते वापरायला देणे हा कायदेशीर गुन्हा आहे. कमिशनमुळे आपल्यालाही शिक्षा होऊ शकते.
डिजिटल व्यवस्थेमुळे आपण आपल्या खात्यावर एक रुपयाचा व्यवहार केला तरी त्याची नोंद सरकारी दरबारी होते हे समजून घ्यावे. आपले खाते आपणच वापरा, पैशाचे आमिष आणि गुन्हेगारी प्रवाहापासून दूर राहा. जगामध्ये पैसा फुकट मिळत नाही त्यासाठी हवी आहे वित्तीय साक्षरता.
तुमची फसवणूक झाली तर न घाबरता आपण 1930 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करावा. निसंकोचपणे झालेली फसवणूक सांगा. जेणेकरून दुसरेही खातेदार शहाणे होतील. यातून त्यांनाही धडा मिळेल. सरकारचे https://cybercrime.gov.in/ हे पोर्टलसुद्धा आहे. यावरसुद्धा सायबर तक्रारी दाखल करता येतात.






