पिंपरी | पीएमपी बस स्टॉपमधील डांबरीकरणाला अखेर मुहूर्त

पिंपळे गुरव, (वार्ताहर) – पिंपरी चिंचवड महापालिकेने काही भागात स्मार्ट सिटी अंतर्गत विविध विकासकामे केली. त्यामध्ये पिंपळे गुरवचा समावेश असल्याने येथील रस्ते सिमेंट काँक्रिटचे झाले होते. परंतु पिंपळे गुरवमधील शेवटचा पीएमपी थांबा मात्र विकासापासून दूर राहिला होता.
येथील बस स्थानकातील डांबरीकरण बाकी असल्याने प्रवाशांसह स्थानिक नागरिक व पीएमपी कर्मचारी त्रस्त होते. अखेर येथील बस थांब्याचे डांबरीकरण पूर्ण केल्याने नागरिकांसह प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे.
काही तांत्रिक अडचणीमुळे येथील पीएमपीएमएल बस थांबा दुर्लक्षित होता. परंतु नागरिकांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाने दखल घेत बस स्थानकाचे डांबरीकरण पूर्ण करून रस्ता खड्डे मुक्त केला.
बस थांब्यामधील जागेचे डांबरीकरण बाकी असल्याने पीएमपी आली की सर्व परिसरात धुळीचे साम्राज्य पसरत होते. प्रवाशांसह कर्मचार्यांच्या नाकातोंडात धूळ जात होती. त्यामुळे नागरिक त्रस्त होते. येथील बस थांब्याचे डांबरीकरण करण्याची मागणी वारंवार करण्यात येत होती.
परंतु प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना होती. परंतु नागरिकांनी वारंवार तक्रार केल्याने ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या कर्मचार्यांनी महापालिकेच्या परवानगीने पिंपळे गुरव पीएमपीएमएल बस स्थानकाचे डांबरीकरण पूर्ण करून खड्डे मुक्त केले आहे. यामुळे प्रवाशांना तसेच, बस वाहक चालक यांना दिलासा मिळाला आहे.





