अखेर या निर्मात्याला ‘अॅापरेशन सिंदूर’ टायटल मिळालं; चित्रपटाचं पहिलं लक्षवेधी पोस्टर समोर

Operation Sindoor Movie :पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहिम राबवत पाकिस्तानला जोख प्रत्युत्तर दिले. भारताने ७ मे रोजी पाकिस्तानमधील ९ दहशतवादी छावण्यांवर हवाई हल्ले करून ते उद्धवस्त केले. त्यानंतर भारत पाक यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाककडून खुरामती सुरू असून ड्रोनद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न भारताने हाणून पाडला आहे. या संपूर्ण घटनेवर चित्रपट तयार केला जाणार असून अॅापरेशन सिंदूर हे टायटल रजिस्टर करण्यासाठी निर्मात्यांमध्ये चढाओढ झाल्याची बातमी समोर आली होती. यासंबधीची एक मोठी अपडेट समोर आली आहे.
चित्रपटाचे पहिले पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले आहे. सिनेसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते जॅकी भगनानी यांचे चुलत भाऊ विकी भगनानी आणि निक्की भगनानी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपट निक्की विक्की भगनानी फिल्म्स आणि द कंटेंट इंजिनिअर प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली बनवला जाणार आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कुमार गुप्ता आणि उत्तम माहेश्वरी हे करणार आहेत.
या चित्रपटाचे पोस्टर प्रसिद्ध पापाराझी विरल भयानी यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. ज्यामध्ये एआयने तयार केलेल्या पोस्टरमध्ये एका महिला लष्करी अधिकाऱ्याने हातात बंदूक धरलेली दाखवली आहे. पोस्टरवर ‘भारत माता की जय, ऑपरेशन सिंदूर’ असे लिहिले आहे. हे पोस्टर सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.
पंतप्रधानांचे मानले आभार
मी देशाच्या सैन्याचे आणि माननीय पंतप्रधानांचे आभार मानू इच्छितो, जे आपल्या देशासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. आमचे प्रेम आणि आमच्या प्रार्थना त्या सर्वांसाठी आहेत जे सीमेवर रात्रंदिवस लढत आहेत. हा चित्रपट कधी बनवला जाईल, कधी प्रदर्शित होईल, तसेच कोणते कलाकार यात असतील, याबद्दल कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. पण पोस्टर पाहून हे स्पष्ट होते की हा चित्रपट महिलाकेंद्रित असणार आहे. हा चित्रपट कर्नल सोफिया कुरेशी किंवा विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्यावर आधारित असू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.

