अखेर ठाकरे गटाचे दसरा मेळाव्याचे ठिकाण ठरलं; उद्धव ठाकरे म्हणाले, “परंपरेप्रमाणे…”

Shiv Sena Dasara Melava | आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. त्यादरम्यान होणाऱ्या शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यापूर्वी शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे गटाचा दसरा मेळावा नेमका कुठे होणार? हा प्रश्न निर्माण झाले होते. नुकतेच उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी गोंधळ गीताचा अनावरण सोहळा पार पडला. या सोहळ्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्याबद्दल भाष्य केले.
अखेर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याचे ठिकाण जाहीर केले आहे. मुंबई महापालिकेकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मेळाव्यासाठी शिवाजी पार्कची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा आवाज घुमणार आहे.
उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत गाणं लाँच
याशिवाय आजच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत घटस्थापनेचा मुहूर्त साधत गोंधळ गीत सादर करण्यात आलं. ‘असुरांचा संहार कराया मशाल हाती दे’ हे नंदेश उमप यांच्या आवाजातील गाण्याचं लाँच करण्यात आले आहे.
“आजपासून नवरात्री सुरू होत आहे. मी आपल्या माध्यमांच्या माध्यमातून नवरात्रीच्या शुभेच्छा देतो. परंपरेप्रमाणे आपण दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कात भेटणार आहोतच. आजची राजकीय पत्रकार परिषद नाही. राज्यात जे अराजक माजलं आहे. त्यावर एक गाणं आलं आहे. राज्यात तोतयेगिरी सुरू आहे. या तोतयेगिरीचा नायनाट करण्यासाठी आपण गाणं तयार केलं आहे. ते देवी आणि जनतेच्या चरणी सादर करत आहोत”, असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले. Shiv Sena Dasara Melava |
“सध्या अराजक माजलं आहे. त्यामुळे आम्ही अराजकीय गाणं आणलं आहे. दसऱ्याला सर्व गोष्टींचा फडशा पाडणार आहे. आता सणासुदीचे दिवस आहेत. कर्तव्याला कोणी विसरू नये म्हणून गाण्याच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबई महानगर पालिकेने दिली परवानगी
दरम्यान, दसरा मेळाव्यासाठी काही महिने आधीच ठाकरे गटाने मैदानाची मागणी करणारे पत्र मुंबई महापालिकेला पाठवले होते. मात्र, महापालिकेने कोणताही निर्णय घेतला नव्हता. मैदानाच्या परवानगीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबई महानगर पालिकेला स्मरण पत्र पाठवले होते. अखेर आज ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मुंबई महानगर पालिकेने शिवाजी पार्क मैदान उपलब्ध करुन दिले आहे. त्यामुळे यंदा छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर ठाकरेंचाच आवाज घुमणार आहे. Shiv Sena Dasara Melava |





