कोकणात ठाकरेंना मोठा धक्का; अखेर राजन साळवींचा शिंदे गटात प्रवेश

मुंबई : राजापूर मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोड चिट्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. ठाण्यातील आनंद मठाजवळ एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राजन साळवी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी त्यांनी मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन केलं तसंच शेकडो कार्यकर्त्यांनी देखील सेनेत प्रवेश केला. उदय सामंत यांच्यासह शिवसेनेचे अधिकारी तसेच हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे.
दरम्यान, राजन साळवी यांच्या पक्ष प्रवेशामुळे कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. राजन साळवी यांनी काही महिन्यांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता. ‘मी बाळासाहेबांचा लाडका शिवसैनिक आहे. त्यांना अभिप्रेत असलेले काम मी आजपर्यंत केले आणि त्यांच्याच विचारांचे काम मी पुढे नेणार आहे, असे राजन साळवी यांनी म्हटले.
कोण आहेत राजन साळवी?
१९९३ ते ९४ सुमारास राजन साळवी शिवसेनेत सक्रिय झाले. तसेच रत्नागिरी नगर परिषदेच्या इतिहासात ते पहिल्यांदाच शिवसेनेचे नगराध्यक्षही झाले. त्यानंतर त्यांनी राजकारणात शिवसेनेत अनेक पदे भूषवली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद व शिवसेनेचे तत्कालीन नेते माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या सहकार्यान राणे यांनीच त्यांना शिवसेनेचे जिल्हाप्रमुखही केले होते.
राजन साळवी यांची जिल्हाप्रमुख पदाची कारकीर्द यशस्वी ठरली. त्यानंतर त्यांनी भारतीय विद्यार्थी सेनेपासून काम सुरू केले. त्यांनी आजवर अनेक आंदोलनांमध्येही सक्रिय सहभाग घेतला आहे. रत्नागिरी जिल्हयाचा जिल्हाप्रमुख सन १९९५-२००४ महाराष्ट्रात उत्कृष्ट जिल्हाप्रमुख म्हणून काम केले. सन २००४ ला मा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवतिर्थावर सन्मानाची ढाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. सन २००६ रोजी राजापूर विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीमध्ये १६०० मतांनी पराभव झाला होता.
त्यानंतर २००९ रोजी राजापूर विधानसभा मतदार संघातून २५ हजार मतांनी आमदार म्हणून निवडून आले. पुन्हा एकदा २०१४ रोजी राजापूर विधानसभा मतदार संघातून ४० हजार मतांनी आमदार म्हणून निवडून आले. २०१९ रोजी सलग तिस-यांदा शिवसेना पक्षातून आमदार झाले. सन २०११ मध्ये अणुऊर्जा प्रकल्प आंदोलनामध्ये १९ दिवस जेलमध्ये राहावे लागले होते. शिवसेनेचा एक लढवय्या शिवसैनिक ते नेता असा त्यांचा आजवरचा प्रवास राहिला आहे.
राज्यात राजकीय भूकंपानंतर शिवसेनेत फूट पडली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना ठाकरे गटाचे उपनेता केले होते. अलीकडे झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण उर्फ भैय्या सामंत यांनी पराभव केला. विधानसभा निवडणुकीत विनायक राऊतांनी मदत न केल्याचा आरोप राजन साळवींनी केला होता. अवैध मालमत्ताप्रकरणी एसबीकडून राजन साळवींच्या घरी छापेमारी करण्यात आली होती.





