अखेर मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे; मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट

जालना – मागील 17 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले उपोषण मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज मागे घेतले आहे. आज सकाळीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी समजूत काढल्यानंतर अखेर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्र्याच्या हातून ज्यूस पिऊन मनोज जरांगे पाटील यांनी अखेर उपोषण सोडले आहे. मात्र उपोषण मागे घेतले असेल तरी आंदोलन सुरुच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे. “मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील. मी माघार घेणार नाही. समाजाला विचारुन मी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. मराठा समाजाला केवळ एकनाथ शिंदे हेच न्याय मिळवून देतील असा मला विश्वास आहे. त्यांनी येथे येऊन ते सिद्ध केले आहे,” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मराठा समाजाला आरक्षण देणं ही सरकारची इच्छा – एकनाथ शिंदे
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ज्याचा हेतू स्वच्छ असतो. त्याला जनता पाठिंबा देते. मराठा समाजाला आरक्षण देणं ही सरकारची इच्छा असल्याचे म्हंटले आहे. दरम्यान, अंतरवाली सराटी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, मंत्री संदिपान भुंबरे, मंत्री उदय सामंत, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार राजेश टोपे, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे नेते उपस्थित आहेत.





