पुणे, {प्रभात वृत्तसेवा} : मिळकतकराची थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेकडून बुधवारी ५३ मिळकतींचा लिलाव ठेवण्यात आला होता. मात्र, त्यातील केवळ एक मिळकतीची लिलावात विक्री झाली असून, त्या महापालिकेस साडेअठरा लाख रुपये मिळाल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. या मिळकतीचा थकीत कर १८ लाख रुपये होता, तर विक्री मूल्य १७ लाख ८३ हजार रुपये होते. बोली १ लाख रूपये अधिक दराने लावण्यात आलेली होती. त्यामुळे महापालिकेस लिलावातून एका मिळकतीचा कर वसूल करण्यात यश आले आहे. महापालिकेकडून शहरातील सुमारे २०२ मिळकतींचा लिलाव केला जाणार आहे. त्यासाठी पहिल्या लिलावात ३२ मिळकती महापालिकेने विक्रीसाठी काढल्या होत्या. यात एकही मिळकत विक्री झाली नाही, तर २४ मिळकतधारकांनी महापालिकेचे पैसे भरले. त्यानंतर पालिकेने बुधवारी ५३ मिळकतींचा लिलाव ठेवला होता. दुपारपर्यंत त्यातील सात ते आठ जणांनी कर भरला होता. या लिलावात ४ जण सहभागी झाले होते. मात्र, त्यातील एकाच खरेदीदाराने खराडी येथील एका मिळकतीसाठी बोली लावली होती. ही बोली मिळकतीच्या बाजारभावातील किमतीपेक्षा एक लाखाने अधिक असल्याने महापालिकेस आपला थकीत कर वसूल करता आला असून, उर्वरित रक्कम संबधित मिळकतधारकास दिली जाणार आहे.