नाशिक: राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेच्या स्थगितीवर आज १ मार्च रोजी न्यायालय निकाल देणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. १९९५ मध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधूं विजय कोकाटे यांनी अल्प उत्पन्न गटातून सदनिका आपले नावे केली होती. या प्रकरणी न्यायालयाने कोकाटे यांना २ वर्षांची शिक्षा आणि ५० हजारांचा दंड ठोठावला होता. या प्रकरणी कोकाटेंनी जिल्हा सत्र न्यायालयात अपील अर्ज दाखल केला होता. त्याची सुनावणी आज १ मार्च रोजी होणार आहे. आज अंतिम सुनावणी होणार असून निकाल लागण्याची शक्यता आहे. यामुळे या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोकाटेंच्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती न मिळल्यास त्यांची आमदारकी आणि मंत्रीपद धोक्यात येऊ शकते. तसेच या निकालावरच त्यांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. प्रकरण काय ? १९९५-९६ च्या काळात माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी अल्प उत्पन्न कोट्यातून सदनिका प्राप्त केल्या होत्या. नाशिक शहरातील उच्चभ्रू परिसरात कॅनडा कॅार्नर भागात निर्माण व्ह्यू अपार्टमेंमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्नाचा दाखला दाखवत सदनिका प्राप्त केल्या होत्या. त्याची चौकशी तत्कालीन दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांच्या तक्रारीवरून जिल्हा प्रशासनाने केली होती. गुरुवारी (दि. 20) या प्रकरणात नाशिक न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांच्या भावाला प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. त्याच्यावर आज सुनावणी होऊन निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.