‘अॅापरेशन सिंदूर’ टायटल रजिस्टरसाठी चित्रपट निर्मात्यांमध्ये चढाओढ; संधी कोणाला मिळणार? इतक्यांनी केलेत अर्ज

Operation Sindoor Title Register : गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जम्मू काश्मिरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्याची घटना घडली होती. या भ्याड हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर देत एअर स्ट्राईक करत जम्मूमधील पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तान येथील ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केले. यानंतर आता पाकिस्तानकडून देखील भारतावर मिसाईल हल्ला करण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला असून भारताने देखील आपली संपूर्ण ताकद लावली आहे.
भारताने पाकवर केलेली कारवाई इतिहासाच्या पटलावर असणार आहे. यासाठीच आता अॅापरेशन सिंदूर यावर चित्रपट तयार करण्यासाठी तयारी केली जात असल्याचे माहिती मिळत आहे. बॅालीवूडमध्ये अॅापरेशन सिंदूर हे शीर्षक नोंदवण्यासाठी निर्मात्यांमध्ये चढाओढ होत असल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडिया वापरकर्त्यांनी #OPRATION SINDHUR हा टॅग ट्रेन्ड केला जात आहे. एका अहवालानुसार अॅापरेशन सिंदूर हे शीर्षक नोंदणीकृत करण्यासाठी अनेक मोठ्या निर्मात्यांमध्ये चढाओढ होत असल्याचे सांगितले जात आहे.
फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) चे अध्यक्ष बी.एन. तिवारी यांनी इंडिया टुडे/आज तक शी बोलताना याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आतापर्यंत सुमारे १५ चित्रपट निर्माते आणि स्टुडिओंनी या शीर्षकाची नोंदणी करण्यासाठी अर्ज केले आहेत. ही नोंदणी इंडियन मोशन पिक्चर प्रोड्यूसर्स असोसिएशन (IMPPA) द्वारे केली जात आहे.
बॉलीवूडमध्ये ऑपरेशन सिंदूर हे शीर्षक नोंदवण्याची स्पर्धा सुरू आहे. यासाठी १५ चित्रपट निर्मात्यांनी FWICE शी संपर्क साधला आहे. मात्र, हे शीर्षक कोणाला मिळणार हे उद्याप निश्चित झालेले नाही. पण या हवाई हल्लावर चित्रपट बनविण्यासाठी कोणाचे नाव अंतिम करण्यात येणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
याअगोदर २०१९ मध्ये उरी द सर्जिकल स्ट्राईक हा चित्रपट तयार करण्यात आला होता. त्यानंतर आर्टिकल ३७० हा अभिनेत्री यामी गौतमीची मुख्य भूमिका असलेला चित्रपट तयार करण्यात आला होता. हे दोन्ही चित्रपट केंद्र सरकारने घेतलेल्या धाडसी निर्णयांची कथा सांगणारे होते. यामुळे आता सोशल मीडियावर अॅापरेशन सिंदूर हे शीर्षक वापरून चित्रपट बनवावा अशी मागणी केली जात आहे.





