पुणे | आरटीईच्या सर्व रिक्त जागा भरा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी विनाअनुदानित शाळांतील आरक्षित रिक्त जांगावरील प्रवेशासाठी प्रतीक्षा यादीची आणखी फेरी तातडीने घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी आप पालक युनियनने प्राथमिक शिक्षण संचालकांकडे केली आहे.
यंदा आरटीई प्रवेश प्रक्रिया शासनाच्या एका निर्णयामुळे खोळंबली. मुलांचे तब्बल ३ महिने शैक्षणिक नुकसान झाले.
दिरंगाईमुळे इतरत्र प्रवेश घेणे भाग पडले. सर्व फेऱ्याअंती महाराष्ट्रामध्ये १ लाख ५ च्या जवळपास जागा असताना केवळ ७८ हजार ३९३ जागांवरच प्रवेश झाले असून, १ लाख २७ हजार विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
पुण्यासारख्या शहरातही १७ हजार ५८८ जागांसाठी २३ हजार १९३ जणांना निवडले जात असले, तरी केवळ १३ हजार ६६५ प्रवेश झाले आहेत. याचाच अर्थ तब्बल १० हजार अर्ज फेटाळले आहेत.
ही संख्या पाहता अर्ज फेटाळण्याचे प्रमाण अधिक व संशयास्पद आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी पडताळणी समितीमार्फत किती अर्ज फेटाळले आणि स्वतः शाळांनी किती अर्ज फेटाळले, हे पाहणे गरजेचे आहे.
या सर्व रिक्त जागा पुढील काळासाठी रिक्तच राहणार असल्याने वंचित आणि दुर्बल घटकाची संधी कमी होणार आहे. पुण्यातील काही शाळांमध्ये अजूनही जागा रिक्त असल्याचे कळते. या दिरंगाईला पालक जबाबदार नसून शासनाचे धरसोड धोरण जबाबदार असल्याचा आरोपही युनियनने केला आहे.
मोठ्या प्रमाणात अर्ज का फेटाळले, याचे स्पष्टीकरण प्रशासनाने द्यावे. पडताळणी समिती ही एका व्यक्तीने न हाताळता अपेक्षित समिती सदस्य सक्रियपणे काम करतील हे पाहावे.
याशिवाय त्रुटी दूर करून चिरीमिरीचे व्यवहार बंद करावेत आणि पुढील वर्षासाठी फेब्रुवारीतच प्रवेश प्रक्रिया सुरू करावी, अशा मागण्या युनियनचे समन्वयक मुकुंद किर्दत यांनी केली आहे.




