केंद्रीय मंत्र्याच्या विरोधात राजस्थानात गुन्हा दाखल

अन्य दोन कॉंग्रेस आमदारांचीही साथ
फोन रेकॉर्डिंगच्या पुराव्यावरून केली कारवाई
जयपूर: राजस्थानातील अशोक गहलोत सरकार पाडण्यासाठी आमदारांना पैसे देऊन फोडण्याचा कट रचल्याच्या कारणावरून राजस्थान पोलिसांनी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी कॉंग्रेसचे बंडखोर आमदार भवरलाल शर्मा आणि विश्वेंद्रसिंह यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या दोघांना पक्षातूनही निलंबीत करण्यात आले आहे.
केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह आणि या आमदारांमध्ये पैशाचे व्यवहार होत असल्याची बाब टेलिफोन रेकॉर्डिंगमधून उपलब्ध झाली असून त्या अनुषंगाने सरकार पाडण्याचा कट रचल्याबद्दल त्यांच्या विरोधात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सचिन पायलट यांच्या गटात या आमदारांचा सहभाग असून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यासाठी राजस्थानचे पोलीस दल हे आमदार हरियानांतील ज्या रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले
आहेत तिकडे रवाना करण्यात आले आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.
टेपमधील आवाज आपला नाही, आपण कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत असे त्यांनी म्हटले आहे. कॉंग्रेस आमदारांना पैसे देऊन फोडून सरकार पाडण्याचा कट केल्याबद्दल राजस्थानातील व्यापारी संजय जैन यांना या आधीच अटक करण्यात आली आहे.
या संबंधात आज पत्रकारांशी बोलताना कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी सांगितले की, सरकारला दोन फोन रेकॉर्डिंगचे पुरावे मिळाले असून यात कॉंग्रेसचे आमदार भवरलाल शर्मा हे भाजपच्या एका नेत्याशी पैसे देऊन आमदार फोडण्याच्या व्यवहारावर चर्चा करीत आहेत.
भाजपचे हे ज्येष्ठ नेते म्हणजेच केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत हेच असल्याचे त्यांनी सुचित केले. ते केंद्र सरकारच्या जलशक्ती
विभागाचे मंत्री आहेत. कालच त्यांच्यातील या ऑडिओ टेप सर्वत्र व्हायरल झाल्या आहेत. त्या टेपमधील संभाषण सुरजेवाला यांनी आज लिखित स्वरूपात पत्रकारांना सादर केले. कॉंग्रेसचे आमदार फोडण्यासाठी आमदारांना 20 कोटी रूपयांची ऑफर देण्यात आली होती त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत असे मुख्यमंत्री गेहलोत यांनी कालच पत्रकारांना सांगितले होते.





