राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करा आणि मनसेची मान्यताही रद्द करा; उच्च न्यायालयात याचिका दाखल

Raj Thackeray | अमराठी भाषिकांविरुद्ध चिथावणीखोर भाषणे आणि प्रक्षोभक वक्तव्ये केल्याबद्दल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी ह्या याचिकेद्वारे राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. इतकेच काय तर, मनसेची राजकीय मान्यता रद्द करण्याची मागणी देखील केली आहे.
कोर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारले
परंतु, सोमवारी या याचिकेवरील सुनावणी दरम्यान मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठानं याचिकाकार्त्यांनाच खडेबोल सुनावले. या याचिकेच्या वैधतेवर सवाल उपस्थित करत आधी याचिकेतून ‘उत्तर भारतीय’ आणि ‘अमराठी भाषिक’ हे शब्द वगळा, असे स्पष्ट निर्देश दिले. यानंतरच याचिकेवर सुनावणी घेण्याबाबत विचार केला जाईल, असे उच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना सुनावले.
मुळात ‘उत्तर भारतीय’ आणि ‘अमराठी भाषिक’ असा वाद उपस्थित करण्याची गरज काय? असा सवाल यावेळी उच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना विचारला. हा वाद केवळ ‘द्वेषपूर्ण भाषण’ या शब्दातून सांगता येऊ शकतो. द्वेषपूर्ण भाषण हा शब्द हा तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी पुरेसा असल्यानं हे दोन शब्द तुमच्या याचिकेतून काढून टाका. त्यानंतरच प्रतिवाद्यांना नोटीस बजावली जाईल.
अखेर यातून आक्षेपार्ह शब्द वगळण्याची तयारी दर्शविल्यानंतर हायकोर्टाने या याचिकेची नोंद घेतली आहे. कोर्टाने राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस जारी करत 4 आठवड्यांच्या आत यावर आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. Raj Thackeray |
याचिकेत नेमकं काय म्हंटले?
सुनील शुक्ला यांनी दाखल केलेल्या याचिकेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे हे गेल्या कित्येक वर्षांपासून मराठी भाषेच्या मुद्द्यावरून सातत्याने अमराठी भाषिकांना टार्गेट करत आहेत. त्यांच्या प्रक्षोभक भाषणांमुळे महाराष्ट्रातील उत्तर भारतीय-हिंदी भाषिक लोकांविरुद्ध धमक्या आणि हिंसेच्या घटना वाढत चालल्या आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करावा. तसेच मनसेची मान्यता रद्द करावी, असे आदेश निवडणूक आयोगाला द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. Raj Thackeray |
हेही वाचा:





