चमत्कारासाठी नव्हे, तर विजयसाठी निवडणूक लढवतो – मुनगंटीवार

नागपूर, – राज्यसभेसाठी भाजपने विचारपूर्वकच तीन उमेदवार उभे केले होते. आमदारांच्या सद्सदविवेक बुद्धीच्या आधारावर आमचा तिसरा उमेदवार निवडून आला. आता विधान परिषदेसाठीही आम्ही चमत्कारासाठी पाचवा उमेदवार उभा केला नाही, तर त्याच्या विजयासाठी नियोजन केले आहे. त्यामुळे आम्हीच विजयी होऊ, असे मत भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी येथे व्यक्त केले.
नागपूर येथे आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, विधानपरिषद निवडणुकीची आम्ही अतिशय नियोजनपूर्वक तयारी केली आहे. 24 ऑक्टोबर 2019 रोजी आमच्याशी धोका झाला होता. मतदारांशी गद्दारी करण्यात आली होती. त्यामुळे आता “जैसे करम केले, तसाच फळ देईल आमदार’ अशी वेळ आल्याचे मुनगंटीवार म्हणाले.
तसेच शिवसेनेचे आमदार जर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला मतदान करणार नाही, असे म्हणत असेल तर त्यात त्यांचे काही चुकले नाही. जनतेने त्यांना कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात निवडून दिले आहे. शिवसेनेचा खरा आमदार कदापि कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला मतदान करू शकत नाही, असेदेखील मुनगंटीवार म्हणाले.





