मोहरमच्या मिरवणुकीत एकाला फायटरने मारहाण

संगमनेर – मोहरमनिमित्ताने शुक्रवारी रात्री निघालेल्या मिरवणुकीत जोर्वेनाका येथील एकाने सवारीलाच धक्काबुक्की केल्याने त्याची विचारणा करणाऱ्या अश्पाक अल्ताफ शेख या तरुणाच्या डोक्यात लोखंडी फाईटने प्रहार करण्यात आला. त्यात अश्पाक याच्या डोक्याला दुखापत झाली असून मध्यरात्री त्याने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन तलहा करीम शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
मोगलपूरा मशिदीच्या पाठीमागील शिकलकर गल्लीत ही घटना घडली आहे. सालाबादप्रमाणे जेधे कॉलनी येथील समीर राजू शेख यांच्या अंगात सवारी येत असल्याने त्याच कॉलनीत राहणारा अश्पाक अल्ताफ शेख (वय 32) व जमीर राजू शेख हे दोघे समीर शेख यांच्यासह सवारी घेऊन जेधे कॉलनी, मेनरोड, सय्यदबाबा चौक मार्गाने गेले. रात्री साडेनऊच्या सुमारास ते दोघेही अंगात सवारी असलेल्या समीर शेख याला घेऊन शिकलकर गल्लीतून मोगलपूरा मशिदीकडे जात असताना जोर्वे नाक्यावरील तलहा शेख याने समीर शेख यांना धक्का दिला.
त्यावरून अश्पाक व जमीर शेख यांनी त्याच्याकडे विचारणा केली असता त्याचा राग येऊन तलहा शेख याने त्याच्या हातात असलेल्या लोखंडी फाईटरने अश्पाक याच्या डोक्यावर प्रहार केला. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून त्यातून रक्तस्रावही सुरू झाला. पोलिसांनी जोर्वेनाका येथील तलहा करीम शेख याच्या विरोधात घातक शस्त्रांचा वापर करून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.




