FIFA Women’s World Cup 2023 : अंतिम लढतीत इंग्लंडला हरवत ‘स्पेन’ने रचला इतिहास

सिडनी :- फिफा महिला विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत रविवारी स्पेनने ऐतिहासिक कामगिरी केली. त्यांनी बलाढ्य इंग्लंड महिला फुटबॉल संघाचा अटीतटीच्या लढतीत 1-0 असा पराभव केला व विश्वकरंडकावर नाव कोरले. हे स्पर्धेच्या इतिहासातील स्पेनचे पहिलेच विश्वविजेतेपद ठरले आहे.
या स्पर्धेच्या अंतिम लढतीत दोन्ही संघांनी एकमेकांचा बचाव बेदण्याचा अटोकाट प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश येत नव्हते. अखेर पहिल्याच हाफमध्ये स्पेनच्या ओल्गा कारमोनाने इंग्लंडचा बचाव भेदण्यात यश प्राप्त केले व 29 व्या मिनिटाला पहिला गोल करत स्पेनला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.
त्यानंतर दुसऱ्या हाफमध्येही त्यांनी इंग्लंडचे सर्व प्रयत्न फोल ठरवले व याच गोल फरकाने सामना जिंकत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. स्पेन आणि इंग्लंड हे दोन युरोपियन देश या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच समोरासमोर आले होते.
जगभरातील अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आजवर 13 वेळा या दोन संघांत सामने झालेले असून, त्यात इंग्लंडने केवळ 2 सामने गमावले असून, 11 वेळा स्पेनला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
मात्र, यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेत बलाढ्य मानल्या जात असलेल्या इंग्लंडचा पराभव करत स्पेनने विश्वकरंडक विजयाचे आपले स्वप्न पूर्ण केले.





