English Premier League 2024 : मँचेस्टर सिटीने सलग चौथ्यांदा पटकावले विजेतेपद…

English Premier League 2024 : मँचेस्टर सिटीने रविवारी इंग्लिश प्रीमियर लीग (ईपीएल) 2023-24 चे विजेतेपद जिंकले. सिटीने एकूण आठव्यांदा ईपीएल विजेतेपद पटकावले आहे. त्याच वेळी, मँचेस्टर सिटी इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये सलग चौथ्यांदा चॅम्पियन बनले आहे. यासह, सलग चार वेळा इंग्लिश प्रीमियर लीगचे विजेतेपद जिंकणारा हा पहिला संघ ठरला आहे. यापूर्वी मँचेस्टर युनायटेडने सलग तीन वेळा इंग्लिश प्रीमियर लीगचे विजेतेपद पटकावले होते.
फिल फोडेन ठरला मँचेस्टर सिटीच्या विजयाचा हिरो
सीझनच्या अंतिम फुटबॉल सामन्यात मँचेस्टर सिटीने वेस्ट हॅमचा 3-1 ने पराभव केला. अंतिम सामन्यात मँचेस्टर सिटीने वेस्ट हॅमविरुद्ध आक्रमक खेळ दाखवला, ज्यासाठी ते ओळखले जातात. फिल फोडेनने सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला गोल करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानतंर फिल फोडेनने 18 व्या मिनिटाला दुसरा गोल करून संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर मोहम्मद कुदुसने वेस्ट हॅमसाठी 42 व्या मिनिटाला गोल केला, जो संघाच्या पुनरागमनासाठी पुरेसा नव्हता. यानंतर रॉड्रिने 59 व्या मिनिटाला गोल करत मँचेस्टर सिटीला 3-1 अशी आघाडी मिळवून दिली, ज्यामुळे मँचेस्टर सिटी संघ सलग चौथ्यांदा चॅम्पियन बनण्यात यशस्वी ठरला.
FULL-TIME | CHAMPIONS AGAIN!!!! 🏆
🩵 3-1 ⚒️ #ManCity | @okx pic.twitter.com/QOtkJQuR1S
— Manchester City (@ManCity) May 19, 2024
आर्सेनलचे विजेतेपद पुन्हा हुकले
मँचेस्टर सिटीने आठव्यांदा इंग्लिश प्रीमियर लीगचे विजेतेपद पटकावले आहे. त्याचवेळी, गेल्या सात हंगामातील मँचेस्टर सिटीचे हे सहावे प्रीमियर लीग विजेतेपद आहे. मँचेस्टर सिटी 91 गुणांसह पहिल्या तर आर्सेनल संघ 89 गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिला. आर्सेनलने एव्हर्टनला 2-1 ने हरवून दिवसाची सुरुवात केली. 2004 पासून प्रीमियर लीगचे जेतेपद न जिंकलेला आर्सेनलचा संघ पुन्हा एकदा ट्रॉफी जिंकण्यापासून वंचित राहिला. आर्सेनल संघ सलग दुसऱ्यांदा दुसऱ्या स्थानावर राहिला.
IPL 2024 : प्लेऑफचे चार संघ झाले निश्चित..! अशा रंगतील लढती, जाणून घ्या पूर्ण वेळापत्रक….
प्रशिक्षक क्लोप यांना विजयासह निरोप…
दुसरीकडे, जुर्जेन क्लोपने लिव्हरपूलसाठी प्रशिक्षक म्हणून शेवटचा सामना खेळला आणि संघाने त्यांना विजयासह निरोप दिला. लिव्हरपूलने त्यांच्या शेवटच्या सामन्यात वोल्व्सचा 2-0 असा पराभव केला.




